इस्रो अॅस्टोसॅट मिशन मोहिमेच्या तयारीत
By Admin | Updated: August 19, 2015 00:03 IST2015-08-19T00:03:28+5:302015-08-19T00:03:28+5:30
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान मोहिमेबरोबरच अॅस्टोसॅट मिशन, आदित्य एल १ या अंतराळ मोहिमांची तयारी सुरू केली

इस्रो अॅस्टोसॅट मिशन मोहिमेच्या तयारीत
पुणे : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान मोहिमेबरोबरच अॅस्टोसॅट मिशन, आदित्य एल १ या अंतराळ मोहिमांची तयारी सुरू केली असून त्यासाठी राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच स्पेस प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या दिशेनेही पाऊल टाकले आहे,अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष ए.एस.किरण कुमार यांनी मंगळवारी दिली.
आयुकातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्पेस एक्सप्लोरेशन’ विषयावरील व्याख्यानात किरण कुमार बोलत होते. इस्रोने राबविलेल्या विविध मोहिमांचा आढावा घेवून किरण कुमार म्हणाले, येत्या सप्टेबर महिन्यात अॅस्टोसॅट मिशन सुरू केले जाणार आहे. या मिशनसाठी आयुकासह कॅनडातील संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे. चांद्रयान २ वर काम सुरू असून २०१७ ते १८ पर्यंत हे मिशन पूर्ण केले जाईल. त्याच प्रमाणे २०१८-१९ या कालावधीत आदित्य एल १ मिशन राबविले जाईल. हे मिशन पाच वर्षांसाठीचे असेल. जमिनीपासून १़५ मिलियन किमी अंतरावर आदित्य एल 1 यान सोडले जाईल. अंतराळ मोहिमांसाठी विविध संस्थांची करार केले जात आहेत.
खासगी कंपन्यांनी स्पेस सायन्सच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास सुरूवात केली असून इस्त्रोने जर्मनीतील एका कंपनीशी याबाबत करार केला आहे.
भारतातील कंपन्यांकडूनही याबाबतचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जात आहे.असे स्पष्ट करून किरण कुमार म्हणाले, विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी इस्त्रोने विविध योजना सुरू केल्या आहेत. भौतिकशास्त्र व गणित या विषयातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जात आहेत. उपग्रह निर्मितीबाबत उपक्रम राबविले जाणा-या विद्यापीठांना किंवा शैक्षणिक संस्थांना इस्त्रोकडून निधी दिला जात आहे. त्यामुळे स्पेस सायन्स क्षेत्रातील अभ्यासक विद्यार्थ्यांनी त्याचा अधिकाधिक फायदा घ्यावा.
सार्क सॅटेलाईट बाबत बोलताना किरण कुमार म्हणाले,सार्क राष्ट्रांची यासंदर्भात नुकतीच बैठक झाली. ब्रॉडकास्टींग, टेलिकम्युनिकेशन, डिझास्टर आदीसाठी सार्क सॅटेलाईटचा उपयोग होणार असून सर्व सार्क राष्ट्रांकडून आवश्यक माहितीचे लिंगिंग करण्याचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)