मरणाच्या सरणाला पर्यावरणाची चिंता...
By Admin | Updated: February 11, 2016 03:04 IST2016-02-11T03:04:18+5:302016-02-11T03:04:18+5:30
जन्माला आलेल्या प्रत्येकालाच शेवटचा श्वास संपला, की जावंच लागतं; पण या गावातील जाणाऱ्या व्यक्तीची चितादेखील पर्यावरणाची चिंता करताना दिसते. आश्चर्य

मरणाच्या सरणाला पर्यावरणाची चिंता...
- अशोक खरात , खोडद
जन्माला आलेल्या प्रत्येकालाच शेवटचा श्वास संपला, की जावंच लागतं; पण या गावातील जाणाऱ्या व्यक्तीची चितादेखील पर्यावरणाची चिंता करताना दिसते. आश्चर्य
वाटलं ना.. पण, खोडद (ता. जुन्नर)
या गावात जन्माला आलेल्या बालिकेचे ज्याप्रमाणे स्वागत होते, त्याचप्रमाणे व्यक्तीच्या मृत्यूनंतरही चितेला मुखाग्नी देताना
पर्यावरणाची हानी होऊ नये, याची काळजी ग्रामस्थांकडून कटाक्षाने घेतली जाते. अंत्यसंस्कारांच्या वेळी अग्नी दिल्यानंतर उपस्थितांना, जीवसृष्टी, पशुपक्ष्यांना ‘त्या’ धुराचा प्रचंड त्रास व प्रदूषण होते, हे त्यांनी अनुभवलं आणि बदलायचं ठरवलं.....!
अंत्यसंस्कारा वेळी जाळलेल्या टायरचा धूर शरीरात गेल्यानंतर माणसाला खूप अस्वस्थता निर्माण होते, तर पर्यावरणातील पशुपक्ष्यांची काय अवस्था होत असेल..? या विचाराने खोडदच्या ग्रामस्थांनी ५ वर्षांपूर्वी हा पर्यावरणपोषक असा निर्णय घेतला. स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी टायरचा वापर न करता केवळ लाकूड, तेल खोबरे, डालडा याचाच वापर करायचा. केवळ स्वयंस्फूर्तीनेच ग्रामस्थांनीच हा निर्णय घेतला आहे. ५ वर्षांपूर्वी टायर न जाळण्याचा निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी देखील केली आहे.
एखाद्या गरीब कुटुंबातील
व्यक्ती जर निधन पावली, तर
ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने लोकवर्गणीतून तेल व डालडा आणून हा विधी पूर्ण करतात. विशेष म्हणजे, कोणाचेही दडपण नाही की कोणाचीही भीती नाही; पण या गावातील व परिसरातील ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने हा नियम पाळतात.
सामुदायिक विवाह सोहळा, विविध सामाजिक उपक्रम यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे व इतर गावांना एक आदर्श गाव म्हणून हेवा वाटणाऱ्या या गावाने हा उपक्रम सुरू करून शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. (वार्ताहर)
टायरच्या धुरातून कॅन्सरही होऊ शकतो...
टायरच्या धुरातून कार्बन मोनोआॅक्साईड, सल्फर ओक्साईड, आॅक्साईड आॅफ नायट्रोजन आणि व्हॉल्याटाईल ओर्गानिक कंपाऊंड हे विषारी वायू बाहेर पडतात; तर आर्सेनिक, कॅडमियम, निकेल, झिंक, मर्क्युरी, क्रोमियम आणि व्हॅनिडीयम हे विषारी धातू बाहेर पडतात. या विषारी वायू व धातूंमुळे नाजूक त्वचेला आणि डोळ्यांना खाज येणे, श्वसनाचे विकार होणे, मेंदूचा कॅन्सर होणे, नैराश्य येणे आदी आजार उद्भवू शकतात.
लाकडाच्या तुलनेत टायरमधून १३ हजार पटींनी अधिक विषारी वायू बाहेर पडून पर्यावरणात मिसळतात. अमेरिका व स्पेनच्या अहवालानुसार टायर जाळल्यामुळे होणाऱ्या वायूच्या उत्सर्गात मानवाला कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरणारे वायू व द्रव्य मोठ्या प्रमाणात आढळतात. बेन्झीन, ब्यूटॅडीन आणि बेन्झ पायरीन ही द्रव्ये व वायू टायरच्या धुरामध्ये आढळून आली आहेत.