पुणे : महापालिकेतील महिला अधिकाऱ्यास जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिल्याप्रकरणी महापालिका भवन व महापालिकेच्या मिळकतींमध्ये प्रवेशबंदी केलेल्या भाजप पदाधिकाऱ्यावरील कारवाई मागे घेण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रशासनावर दबाव आणला जात आहे. याबाबत एका मंत्र्याने काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली आहे. आता भाजपचा एक जबाबदार पदाधिकारी सोमवारी बंदी असलेल्या पदाधिकाऱ्याला घेऊन आयुक्तांची भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला अधिकाऱ्याचा पाठलाग करणे, अवमानास्पद टिप्पणी करून मानसिक त्रास देणे, याप्रकरणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जून महिन्यात भाजपच्या कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्यासह सहा जणांना महापालिका भवन व महापालिकेच्या मिळकतींमध्ये प्रवेशबंदी केली आहे. तसेच, या सर्वांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. कारवाई केलेल्यांमध्ये पदाधिकाऱ्याचे कार्यकर्ते म्हणून त्याची पाठराखण करणाऱ्या महापालिकेच्या कंत्राटी सुरक्षारक्षकांचाही समावेश आहे. महापालिका आयुक्तांनी प्रवेशबंदी केलेल्यांपैकी काही जण महापालिकेत वावरताना दिसतात. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
दरम्यान, प्रवेशबंदीची कारवाई मागे घेण्यासाठी भाजपच्या जबाबदार पदाधिकाऱ्याने दबाव आणल्यामुळे बंदीची कारवाई केलेल्या सुरक्षारक्षकांना पुन्हा कामावर घेण्यात आले आहे. आता महापालिका निवडणूक तोंडावर आहे. अशावेळी एखाद्या पदाधिकाऱ्यावर बंदी असणे हे पक्षासाठी आणि संबंधित पदाधिकाऱ्यासाठी अडचणीचे ठरणारे आहे. या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यावरील प्रवेशबंदीची कारवाई मागे घ्यावी, यासाठी थेट महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांवर दबाव आणला जात आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील एका मंत्र्यांनी ही बंदी मागे घेण्यासाठी आयुक्तांना फोन केला होता. मंत्रिमहोदयांच्या फोननंतर आता भाजपचे एक जबाबदार पदाधिकारी सोमवारी बंदी असलेल्या पदाधिकाऱ्याला घेऊन आयुक्तांची भेट घेणार आहेत. या भेटीत माफीनामा देऊन बंदी मागे घेण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
...तर मग आम्ही काम कसे करायचे?
कार्यालयात काम करताना आम्हाला कायमच राजकीय नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जातो. पहिली वेळ महापालिका आयुक्तांनी धाडस करून कोणावर तरी प्रवेशबंदीची कारवाई केली आहे. राजकीय नेते ही बंदी मागे घेण्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याने बंदी उठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पदाधिकारी व त्याच्या कार्यकर्त्यांवरील बंदी उठवली तर मग आम्ही काम कसे करायचे, अशी प्रतिक्रिया काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Web Summary : A BJP official banned from Pune Municipal Corporation for harassing a female officer faces pressure for reinstatement. Senior leaders are lobbying the commissioner, with a meeting planned to lift the ban, sparking employee concerns.
Web Summary : पुणे नगर निगम से प्रतिबंधित भाजपा अधिकारी की बहाली के लिए दबाव। वरिष्ठ नेता आयुक्त से लॉबिंग कर रहे हैं, जिससे कर्मचारियों में चिंता है कि प्रतिबंध हटाया जा सकता है।