शिकाऊ उमेदवार योजनेसाठी उद्योजगताने घ्यावा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:19 IST2021-03-13T04:19:21+5:302021-03-13T04:19:21+5:30
पुणे : महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार ...

शिकाऊ उमेदवार योजनेसाठी उद्योजगताने घ्यावा पुढाकार
पुणे : महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना येत्या १ मेपासून सुरू करण्याचे जाहीर केले. या योजनेला उद्योग जगताने प्रोत्साहन द्यायला हवे, असे आवाहन यशस्वी अॅकेडमी फॉर स्किल्स संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी केले.
राज्य सरकारची ही योजना गेल्यावर्षी १५ ऑगस्टला चालू होणार होती. मात्र कोविड प्रादुर्भाव आणि टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर त्या योजनेची सुरुवात होऊ शकली नाही. या योजनेद्वारे शिकाऊ उमेदवारांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाच्या ७५ टक्के किंवा रुपये पाच हजार यापैकी जी रक्कम कमी असेल तितकी रक्कम शासनाकडून देण्यात येणार आहे. सन २०२१-२२ मध्ये दोन लाख युवक युवतींना या योजनेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या योजनेमुळे राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकणार आहेत.
कुलकर्णी म्हणाले की, ही योजना यशस्वी होण्यासाठी औद्योगिक आस्थापनांनी, विशेषतः लघुउद्योजकांनी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे. लघुउद्योजकांना खूप मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे. एकीकडे टाळेबंदीमुळे व्यवसाय डबघाईला येऊ लागलेला, बँकांची थकीत देणी, मोठ्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या कामाबाबत अनिश्चितता, केलेल्या कामाचे वेळेवर पैसे न येणे अशी परिस्थिती तर दुसरीकडे कच्च्या मालाच्या किमतीमध्ये झालेली लक्षणीय वाढ, पेट्रोल व वीज दरात झालेली भाव वाढ यामुळे लघुउद्योजक खूपच त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत राज्य शासनाने जाहीर केलेली ही महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजना वरदान ठरणार आहे. विद्यावेतनासाठी दरमहा प्रतिप्रशिक्षणार्थी पाच हजार रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याने कार्यरत मनुष्यबळावरील लघुउद्योजकांच्या खर्चाचा भार हलका होईल.