पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीवर अतिक्रमण करत पॉवर आॅफ अॅटर्नी होल्डर दाखवून संबंधित जागा भाड्याने देत लाखो रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. कोंढव्यातील जमिनीवर आॅक्टोंबर २०१७ पासून अतिक्रमण करण्याचा प्रकार सुरू होता. याप्रकरणी सैन्यातील सेवानिवृत्त कॅप्टन परमिंदरसिंग सरदार अवतारसिंग चंडिओक (वय ८२, रा. जे-१९, साळुंखेविहार) यांनी कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयुब पटवेकर, हबीबा अन्सार शेख, आरिफ मन्सूर सय्यद (सर्व रा. नानापेठ) आणि आत्तारबशीन महम्मद सोहेल हमीद (रा. कॅम्प) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंडिओके हे सैन्यातून निवृत्त झाले आहेत. त्यांची कोंढवा येथे सर्व्हे नंबर ११ हिस्सा मधील हिस्सा नं.१५ मध्ये ३६ आर ही मिळकत जमीन आहे. फिर्यादींच्या शेजारी स.नं.११ हिस्सा नं.१६, १७, १८ असे तीन हिस्से असून १६ नंबरचा हिस्सा हा ४२ आरचा आहे. त्यामध्ये सोमनाथ सदाशिव रासकर यांची ११ आर ही मिळकत मालकीची आहे. ही मिळकत त्यांनी अयुब उस्मानगनी पटवेकर व हबिबा अन्सारी शेख यांना खरेदी दस्त करून दिली. त्यावेळी पटवेकर व अन्सारी यांनी नोंदणी कार्यालयात रासकर यांच्याशी कुलमुखत्यारपत्र दस्त केला. मात्र रासकर यांच्याशी पूर्ण व्यवहार केला नसून त्याबाबत दावा दाखल आहे. दरम्यान, कुलमुखत्यार पत्राचा वापर करीत आरोपींनी हिस्सा नं. १६ चे कागदपत्र वापरून फिर्यादी यांच्या हिस्सा १५ वर अतिक्रमण केले. त्याजागेवर स्वत:चे मीटर लावून २४ मीटर लांबीचे शेडही उभारले. तसेच या जागेवर इमारत असल्याचे दाखवून त्यातील ७२५ स्क्वेअर मीटर जागा एकास भाड्याने दिली. त्यासाठी संबंधित व्यक्तीकडून ६ लाख रुपये डिपॉझिट घेतले व दरमहा ५० हजार रुपये भाडे असा करार केला. हा प्रकार लक्षात येताच फिर्यादी यांनी आरोपींच्या ठेकेदारांना शेड न मारण्याची ताकीद दिली होती. मात्र त्याचा काहीच उपयोग न झाल्याने त्यांनी कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर करीत आहेत.
सैन्यातील सेवानिवृत्त कॅप्टनच्या जमिनीवर अतिक्रमण ,कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 19:45 IST
बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीवर अतिक्रमण करत पॉवर आॅफ अॅटर्नी होल्डर दाखवून संबंधित जागा भाड्याने देत लाखो रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.
सैन्यातील सेवानिवृत्त कॅप्टनच्या जमिनीवर अतिक्रमण ,कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल
ठळक मुद्देकुलमुखत्यार पत्राचा वापर करत आरोपींनी अतिक्रमण