हेवेदाव्यांचा त्रास नको म्हणून नोंदणी पद्धतीने विवाह करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:09 AM2021-07-28T04:09:52+5:302021-07-28T04:09:52+5:30

पुणे : कोरोना काळात लग्नाचा बार जल्लोषात उडवण्यापेक्षा आणि विवाहावर अमाप खर्च करण्यापेक्षा नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांच्या संख्येत ...

Emphasis on getting married in a registered manner so as not to bother with claims | हेवेदाव्यांचा त्रास नको म्हणून नोंदणी पद्धतीने विवाह करण्यावर भर

हेवेदाव्यांचा त्रास नको म्हणून नोंदणी पद्धतीने विवाह करण्यावर भर

Next

पुणे : कोरोना काळात लग्नाचा बार जल्लोषात उडवण्यापेक्षा आणि विवाहावर अमाप खर्च करण्यापेक्षा नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांच्या संख्येत दीड वर्षापासून वाढ झाली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे मार्चचा निम्मा महिना, एप्रिल आणि मे मधील काही दिवस नोंदणी कार्यालय बंद होते. अनेकांच्या नोकरी, व्यवसायावर गदा आल्याने नोंदणी विवाहावर परिणाम झाल्याचे दिसून आले. अजूनही कोरोना आणि नोकरीच्या अस्थिरतेची टांगती तलावर असल्याने नोंदणी विवाहालाच जोडप्यांनी प्राधान्यक्रम दिला आहे. यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत नोंदणी पद्धतीने ३ हजार ६१२ जोडप्यांचे ‘शुभमंगल’ पार पडले आहे.

मित्रमंडळीच्या उपस्थितीत आप्तेष्ट, नातेवाइकांच्या आशीर्वादाने विवाह होण्याचा एक सुखद अनुभव असतो. मात्र, कोरोनाने अनेकांच्या वाजतगाजत विवाह करण्याच्या आनंदावर विरजण पाडले. गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे विवाह समारंभावर अनेक निर्बंध आल्यामुळे पाचशे ते हजार लोकांच्या उपस्थितीत विवाह होत नाहीत. आजमितीला शासनाने विवाहासाठी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा आहे. मात्र, एकाला बोलावले आणि दुसऱ्याला नाही यातून नातेवाईक, मित्रमंडळी दुखावण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोडप्यांनी कोरोनाचे कारण पुढे करीत नोंदणी पद्धतीने विवाह करण्यास पसंती देत आहेत. यातच विवाहाच्या बाबतीत येणाऱ्या परवानग्यांच्या अडचणी, नियामवली आणि खर्च यामुळे जोडपी पैशांची बचत करण्यावर भर देत आहेत. २०२० मध्ये नोंदणी पद्धतीने ५ हजार २२२ विवाह झाले. त्यावर्षीच्या तुलनेत यंदा सहा महिन्यांतच निम्मे नोंदणी विवाह झाले आहेत.

--------------------------------------

कोरोना काळ हा अनेकांची परीक्षा घेणारा ठरला आहे. गेल्या वर्षीपासूनच स्थळ बघायला सुरुवात केली आहे. या काळात बहुतांश स्थळ पाहिली. पण मुलीसह तिच्या कुटुंबाच्या अपेक्षा खूप आहेत हे जाणवले. त्यामुळे तूर्तास तरी विवाह करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. मात्र, भविष्यासाठी पैसा वाचवणे खूप आवश्यक असल्याने नोंदणी पद्धतीनेच विवाह करण्याचा मी निर्णय घेतला आहे.

- सूरज काळे, तरुण

----------------------------------

यंदा नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आपल्या सोयीप्रमाणे आणि आपल्याला हवी ती तारीख निवडून जोडपी विवाहबद्ध होत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे काही निर्बंध असल्यामुळे फक्त मे महिन्यात नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या घटली. परंतु, जूनमध्ये पुन्हा ते प्रमाण वाढले. हे प्रमाण आणखी वाढेल असा अंदाज आहे. नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठीची प्रक्रिया खूप सुटसुटीत आहे.

- डी. ए. सातभाई, विवाह नोंदणी अधिकारी

-----------------------------------

२०२० आणि २०२१ मधील सहा महिन्यांतील नोंदणी पद्धतीने झालेले विवाह

महिना २०२० २०२१

जानेवारी ६८६ ६६८

फेब्रुवारी ७३६ ६७१

मार्च ३३६ ६९२

एप्रिल - ५०७

मे ८४ ४८२

जून १९९ ५९२

जुलै ३८३

ऑगस्ट ४३९

सप्टेंबर ४२९

ऑक्टोबर ५४४

नोव्हेंबर ५६२

डिसेंबर ८३२

---------------------------------------------------------------

एकूण ५२२२ ३६१२

------------------------------------

Web Title: Emphasis on getting married in a registered manner so as not to bother with claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.