दोन महिन्यांमध्ये अकरा बछडे आईच्या कुशीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:10 IST2021-04-11T04:10:29+5:302021-04-11T04:10:29+5:30
पुणे : जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा अधिवास आता उसाची शेती बनली आहे. त्यामध्ये प्रजनन झाल्यावर बछडे आढळून येतात. ऊस ...

दोन महिन्यांमध्ये अकरा बछडे आईच्या कुशीत
पुणे : जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा अधिवास आता उसाची शेती बनली आहे. त्यामध्ये प्रजनन झाल्यावर बछडे आढळून येतात. ऊस काढताना तर हमखास बछडे दिसून येतात. या बछड्यांना पुन्हा त्यांच्या आईच्या कुशीत सोडण्यात येते. गेल्या दोन महिन्यांत सुमारे ११ बछडे आपल्या आईकडे गेली असून, हे काम वन विभाग आणि वाइल्डलाइफ एसओएस संस्थेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, ओतूर वनपरिक्षेत्रातील बोरी गावात शुक्रवारी एक दोन महिन्यांचा बछडा सापडला होता. त्याला देखील रात्री रेस्क्यू टीमने त्याच्या आईकडे सुरक्षित सोपविण्यास मदत केली.
नुकतेच जुन्नर तालुक्यातील वडगाव साहनी गावातील उसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे आढळले होते. स्थानिक नागरिकांनी लगेच त्याची माहिती वन विभागला कळविली होती. त्यानंतर वनअधिकारी आणि वाइल्डलाइफ एसओएसच्या रेस्क्यू टीमने येथील बछड्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर बछड्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जुन्नर येथील बिबट निवारा केंद्रात नेले.
पशुवैद्यकीय अधिकारी डॅा. निखिल बांगर यांनी तिन्ही बछड्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात दोन नर व एक मादी होती. त्यांचे वय साधारण पंधरा दिवसांचे होते. ते दिसायला अतिशय हेल्दी होते. त्यामुळे या बछड्यांना त्यांच्या आईकडे पाठविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. ज्या ठिकाणाहून या बछड्यांना ताब्यात घेतले होते. त्या ठिकाणी परत त्यांना सोडण्यात येण्याचे ठरले. त्यासाठी एका खोक्याचा वापर केला. त्या खोक्यात बछड्यांना ठेवले. पहिल्या रात्री तिथे बिबट्या आला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला. तेव्हा त्या बछड्यांची आई तिथे आली. तिने एक-एक करत बछड्यांच्या मानेला अलगद पकडत सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली.
वाइल्डलाइफ एसओएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक सत्यनारायण म्हणाले की, सध्या बिबट्यांचा अधिवास असणारे नैसर्गिक जंगल कमी होत आहे. त्यामुळे ते उसाच्या फडात राहत आहेत. त्यामध्ये प्रजनन होतात. मग ऊसतोड करताना बछडे आढळून येतात. त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो.’’
—————————————
आम्ही गेल्या दोन महिन्यात ११ बछडे आईच्या कुशीत पोचविण्याचे काम केले आहे. त्यासाठी अनेकदा प्रयत्न करावा लागतो. या वेळी दुसऱ्या प्रयत्नात बछड्यांची आई आली आणि त्यांना घेऊन गेली.
- योगेश घोडके, वनाधिकारी, जुन्नर
————————-