काँग्रेसचा पाया उखडून टाकणारी निवडणूक
By Admin | Updated: February 24, 2017 03:12 IST2017-02-24T03:12:32+5:302017-02-24T03:12:32+5:30
गेली काही दशके महापालिकेवर अधिराज्य गाजविणाऱ्या व मागील दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत

काँग्रेसचा पाया उखडून टाकणारी निवडणूक
पुणे : गेली काही दशके महापालिकेवर अधिराज्य गाजविणाऱ्या व मागील दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत भागीदारी करणाऱ्या काँग्रेसचा पाया उखडून टाकणारी ही निवडणूक ठरली आहे़ भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाणामारीत काँग्रेसला नियोजनबद्ध प्रचार करून उभारी घेण्याची चांगली संधी या निवडणुकीत होती़ पण, काही नेत्यांनी आघाडी करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये उमेदवारी निश्चित करण्यात घोळ घालण्यात आला़ एकाच जागेसाठी दोन दोन उमेदवारांना ए व बी फॉर्म देऊन गोंधळ निर्माण केला़ त्यामुळे काही जणांना पंजा हे चिन्ह मिळू शकले नाही़
शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सर्वांना बरोबर घेऊन प्रचाराचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण, इतरांची म्हणावी तेवढी साथ त्यांना मिळाली नाही़ भाजपाने ज्या पद्धतीने प्रचाराचा धुरळा उडवत केंद्रीय नेते, राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभा, पत्रकार परिषदा घेऊन प्रचारात आघाडी घेतली़ काँग्रेसला मात्र तेवढा प्रभावी प्रचार करणे शक्य असूनही नियोजनाअभावी ते करू शकले नाही़
उपमहापौर मुकारी अलगुडे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांना पराभवाची चव चाखावी लागली आहे़
याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले की, हा निकाल विचार करायला लावणारा आहे़ पक्षाचे केडर, संघटना मजबूत करून नेमके कोठे चुकते, याचे आत्मपरिक्षण आम्ही करू़ लोकांचा हा निर्णय आम्हाला मान्य आहे़ असे असले तरी भाजपाने सत्ता मिळविण्यासाठी निवडलेली पद्धत अत्यंत चुकीची आहे़ त्यांनी पैशांचा, गुंडांचा तसेच पोलीस बळाचा वापर उघडपणे केला़ पदयात्रेत गुंड उघडपणे फिरत होते़ तरीही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली़ अगदी निवडणूक आयोगाच्या कामकाजातही हस्तक्षेप केला़ आम्ही हा सर्व प्रकार गांभीर्याने घेणार आहोत़ (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करायची की नाही, या संभ्रमात उमेदवार व कार्यकर्ते शेवटपर्यंत राहिल्याने त्याचा फायदा काँग्रेसला एक प्रभाग सोडता कोठेही झाला नाही़ एकेकाळी एकहाती सत्ता मिळविणाऱ्या काँग्रेसला यंदा कशीबशी दोन आकडी संख्या गाठता आली आहे़ तीन वर्षांपूर्वी केंद्रात व अडीच वर्र्षांपूर्वी राज्यात झालेल्या पराभवानंतर काँग्रेस अजूनही जागी झाली नसल्याचे या निकालाने दाखवून दिले.