बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 11:02 IST2024-09-25T10:56:32+5:302024-09-25T11:02:44+5:30
आज पहाटे ५ वाजता तो प्रातःविधीसाठी गेला असताना बिबट्याने त्याच्यावर झडप घातली

बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात रुपेश तान्हाजी जाधव या आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आज पहाटे ५ वाजता तो प्रातःविधीसाठी गेला असताना बिबट्याने त्याच्यावर झडप घालून जवळच असलेल्या ऊसाच्या शेतात ओढत नेले. म्हैसगाव ता. राहुरी जि. अहमदनगर येथून आठ दिवसांपूर्वी रूपेश आला होता. रूपेशला बिबट्या घेऊन गेल्याचे लक्षात येताच सोडविण्यासाठी कुटुंबातील आणि आजूबाजूच्या व्यक्तींनी आरडाओरडा केला. मात्र बिबट्याच्या तावडीतून त्याची सुटका करण्यास त्यांना अपयश आले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जुन्नर वनविभागाचे प्रदिप चव्हाण हे आपल्या टिम सह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक, रेस्क्यू टीम आणि वनविभागाच्या टिमने रुपेशचा शोध घेतला असता सकाळी साडेसात वाजता त्याचा मृतदेह ऊसाच्या शेतात सापडला.