शैक्षणिक संस्था थकबाकीदार, सिंहगड इन्स्टिट्यूटने थकविले चार कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:46 IST2018-02-09T00:45:55+5:302018-02-09T00:46:12+5:30
पुण्यातील बड्या शैक्षणिक संस्थांनी पुणे महापालिकेच्या तब्बल ६ कोटी ५४ लाख ६९ हजार रुपयांचा कर थकविला आहे.

शैक्षणिक संस्था थकबाकीदार, सिंहगड इन्स्टिट्यूटने थकविले चार कोटी
- सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : पुण्यातील बड्या शैक्षणिक संस्थांनी पुणे महापालिकेच्या तब्बल ६ कोटी ५४ लाख ६९ हजार रुपयांचा कर थकविला आहे. यामध्ये सर्वाधिक ४ कोटीपेक्षा अधिक थकबाकी एकट्या सिंहगड इन्स्टिट्यूटकडे असल्याचे समोर आले आहे.
शिक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये कमाविणाºया संस्थांकडून शासनाच्या विविध विभागांचे कर भरताना पळवाटा काढत असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या मार्चअखेर जवळ आल्याने मिळकतकराची अधिकाधिक थकबाकी वसूल करण्याची मोहीम मिळकतकर विभागाने अधिक तीव्र केली आहे. थकबाकी वसुलीसाठी नियुक्त केलेल्या पथकांकडून प्रामुख्याने बड्या थकबाकीदारांना नोटिसा देणे, जप्ती करणे व मिळकतींना सील ठोकण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. परंतु अद्यापही अनेक बडे थकबाकीदार प्रशासनाच्या गळाला लागलेले नाहीत.
शहरातील सुमारे ५४ शैक्षणिक संस्थांकडे ६ कोटी ५४ लाख ६९ हजार रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये २६ संस्थांनी एक लाखांपेक्षा अधिक कर थकविला आहे. सिंहगड संस्थेच्या मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज आदी विविध शैक्षणिक संस्थांनी तब्बल ४ कोटीपेक्षा अधिक कर थकविला आहे. या सर्व संस्थांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
>योजनांना प्रतिसाद नाही : सामान्यांवर मात्र कारवाई
महापालिकेच्या वतीने थकबाकीदारांनी लाखो रुपयांचा थकीत कर भरावा, यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. वेळेत कर भरणा-यांना करामध्ये सूटदेखील दिली. मात्र, त्यानंतरही शहरातील अनेक मिळकतदारांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. वारंवार योजना राबवूनदेखील याकडे दुर्लक्ष करून थकबाकी न भरणाºया मिळकतींना नोटीस पाठविण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. पालिकेच्या बजेटमध्ये ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या मिळकतींचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये शहरातील अनेक बड्या शैक्षणिक संस्थांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.