समर्थ ग्रुप आणि आयआयआयटी कोट्यायम फाऊंडेशनमध्ये शैक्षणिक करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST2021-03-09T04:12:44+5:302021-03-09T04:12:44+5:30
बेल्हा: येथील समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग व समर्थ पॉलिटेक्निक आणि अटल इन्क्युबेशन सेंटर-आयआयआयटी कोट्यायम फाऊंडेशन, केरळ ...

समर्थ ग्रुप आणि आयआयआयटी कोट्यायम फाऊंडेशनमध्ये शैक्षणिक करार
बेल्हा: येथील समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग व समर्थ पॉलिटेक्निक आणि अटल इन्क्युबेशन सेंटर-आयआयआयटी कोट्यायम फाऊंडेशन, केरळ यांच्यामध्ये नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला.
विशिष्ट क्षेत्रातील दीर्घकालीन संशोधन व विकास प्रकल्प सक्षमपणे राबविण्यासाठी या सामंजस्य करारांतर्गत ज्ञान व माहितीची देवाण-घेवाण करण्यात येणार असल्याचे संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी सांगितले. दरम्यान, हा सामंजस्य करार विद्यार्थी व शिक्षक या दोघांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून कौशल्यवाढीसाठी व रोजगारक्षम दृष्टिकोन विकसित करण्यासाठी फायदेशीर असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.
समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील व समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. अनिल कपिले आणि अटल इन्क्युबेशन सेंटर-आयआयआयटी कोट्यायम, केरळचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरीलाल यांनी सदर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करून शिक्कामोर्तब केले. या करारांतर्गत समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे नोडल सेंटर असणार आहे व त्या अंतर्गत समर्थ पॉलिटेक्निक या विद्यालयाचा समावेश केला आहे.
सामंजस्य करारांतर्गत संकुलातील विद्यार्थ्यांना दोन्ही संस्थांकडून प्रकल्प करण्यासाठी व त्या-त्या विभागांमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी विविध प्रकारच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सेमीनार, अल्पमुदतीतील अभ्यासक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम तसेच जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा आणि परिषद आयोजित करण्यात येणार आहेत. नवीन उद्योग, व्यवसाय कार्यक्रम यासाठी निर्माण होणाऱ्या संधी व त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत.
विषयानुरूप तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शनदेखील विद्यार्थ्यांना वेळोवेळी आयोजित केले जाईल. एखाद्या विशिष्ट विषयाचा अभ्यास करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना या सामंजस्य करारांतर्गत असलेल्या सर्व सुख सुविधांचा वापर करता येणे शक्य होणार आहे.या सामंजस्य कराराची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी एक कृती समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे. हा सामंजस्य करार यशस्वी होण्यासाठी समन्वयक म्हणून प्रा. महेश पोखरकर व प्रा. भूषण बोऱ्हाडे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यासाठी प्रा. प्रदीप गाडेकर, प्रा. प्रवीण सातपुते, प्रा. अमोल खतोडे, प्रा. निर्मल कोठारी यांनी विशेष प्रयत्न केले.