शासकीय शिक्षण की शिक्षा?
By Admin | Updated: September 2, 2015 04:04 IST2015-09-02T04:04:58+5:302015-09-02T04:04:58+5:30
बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून बारामती शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांसाठी शिक्षण मंडळाकडून दिले जाणारे शिक्षण नसून अक्षरश: शिक्षाच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

शासकीय शिक्षण की शिक्षा?
सुनील राऊत , बारामती
बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून बारामती शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांसाठी शिक्षण मंडळाकडून दिले जाणारे शिक्षण नसून अक्षरश: शिक्षाच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शाळांमधील मुलांना पिण्यासाठी पाणी, स्वच्छतागृह, बसण्यासाठी बाकडे, अपंगांसाठी रँप, खेळण्यासाठीची मैदाने या सर्व शिक्षा अभियानांतर्गत बंधनकारक करण्यात आलेल्या सुविधा आठमधील सात शाळांमध्ये नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. विशेष म्हणजे या नगरपालिकेच्या शाळांमधून शिक्षण दिल्या जाणाऱ्या या आठ शाळांची पटसंख्या अवघी १ हजार ३३५ असली, तरी शाळा सुरू होऊन तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी, या मुलांना नगरपालिकेकडून दिले जाणारे गणवेश, दप्तर, तसेच बूट आणि पायमोजे मिळालेले नाहीत. त्यामुळे शाळांचा दर्जा तर सोडाच,
पण शिक्षणाच्या दर्जाबाबतही
प्रश्न उपस्थित केले जात
आहेत.
शिक्षक घरी- मुले रस्त्यावर
शिक्षण मंडळाच्या या शाळांमधील शिक्षकांवर प्रशासनाचा कोणताही वचक नाही अथवा त्यांना शाळेचे गांभीर्यही नसल्याचे या पाहणीत आढळून आले. सर्व शिक्षा अभियानांतर्गत या शाळांमध्ये माध्यान्ह भोजन आल्यानंतर त्याचे काम संबंधित सेविकांवर सोपवून काही शाळांमधील शिक्षक चक्क घरी जेवणासाठी निघून गेले होते. काही ठिकाणी शिक्षक आपल्या खासगी कामांसाठी बाहेर गेल्याने मुले खरंच शाळेत आहेत का, असा प्रश्न पडला.
अनेक ठिकाणी मुले ही शहरातील रस्त्यावर आपली दप्तरे घेऊन आणि काही ठिकाणी वर्ग सुरू असतानाही बाहेर व्हरांड्यात गोंधळ घालत होती. त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, एक शिक्षक बाहेर गेल्याने सर दुसऱ्या वर्गाला शिकवत आहेत, अशी उत्तरे मिळाली, तर अनेक शिक्षकांनी मुख्याध्यापक जेवायला गेले आहेत. आम्हालाही बाहेर जायचंय तुम्ही त्यांनाच शाळेबाबत माहिती विचारा, अशी धक्कादायक उत्तरे दिली.
सुरक्षारक्षकच नाहीत
पालकांनी मुलाला शाळेत पाठविल्यानंतर त्याची सर्व जबाबदारी संबंधित शिक्षण संस्थेची असते. त्यामुळे शाळांच्या आवारातून मुले बाहेर जाणार नाहीत, याची दक्षता शाळांकडून घेतली जाते. नगर परिषदेच्या शाळांबाबत हा प्रकार बरोबर उलटा आहे. या आठमधील एकाही शाळेस रखवालदार अथवा मुलांना शाळेबाहेर जाण्यास मज्जाव करणारा शिपाईच नाही. त्यामुळे ही मुले दिवसभरात कधीही शाळेबाहेर जातात. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या शाळांना सुरक्षारक्षक नसल्याने त्या ठिकाणी भुरट्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच शिक्षण मंडळाने नव्याने सुरू केलेल्या एका एलकेजीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील नव्या कोऱ्या पडद्यांवर चोरांनी डल्ला मारला आहे. याशिवाय शाळेतील इतर साहित्यही लंपास होण्याच्या घटना घडत आहेत.
शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात खासगी शाळांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या शाळांच्या पटसंख्येवर परिणाम पडण्यास सुरुवात झाली असून गेल्या तीन वर्षांत पटसंख्या प्रतिवर्षी घटत असल्याचे दिसून येत आहे. २०१२-१३ मध्ये या शाळांमध्ये एकूण १६३१ मुले शिक्षण घेत होती. २०१३-१४ मध्ये हा आकडा १ हजार ५६६ मुलांवर येऊन पोहोचला, तर या वर्षी २०१५-१६ मध्ये ही पटसंख्या १ हजार ३१५ वर येऊन पोहोचली आहे. मात्र, याकडे नगरपालिका प्रशासन तसेच शिक्षण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने ही स्थिती कायम राहिल्यास या शाळा बंद करण्याची वेळ नगर परिषदेवर येणार आहे.
या स्थितीशी सामना करण्यासाठी नगर परिषदेकडून या वर्षीपासून बालवाडीचे इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. मात्र, त्याव्यतिरिक्त
ही स्थिती सुधारण्यासाठी नगर परिषदेत
एकहाती राष्ट्रवादीची सत्ता असतानाही काहीच
प्रयत्न होताना दिसत नाहीत.
......
नगर परिषदेकडून शहरात पहिली ते सातवीपर्यंतच्या शिक्षण देणाऱ्या सुमारे आठ शाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये या वर्षी सुमारे १ हजार ३१५ मुलांची पटनोंदणी झाली आहे. या शाळांमध्ये प्रामुख्याने कष्टकरी कुटुंबातील मुले आहेत. खासगी शाळांमधील शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने तसेच शाळांसाठीचे सर्व साहित्य नगर परिषदेच्या शाळांमध्ये मोफत मिळत असल्याने पालक या शाळांची वाट धरतात.
मात्र, शारदा प्रांगणाच्या परिसरातील नगर परिषदेची पाच क्रमांकाची शाळा सोडल्यास इतर कोणत्याही शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छ असलेली स्वच्छतागृहे, अपंग मुलांसाठी रँप यांसारख्या मूलभूत भौतिक सुविधा नाहीत.
शाळा क्रमांक १ मध्ये तर मुले, तसेच मुलांसाठी साधे स्वच्छतागृहही नाही. त्यामुळे ही मुले शाळेच्या परिसरातील मोकळ्या जागांचा वापर स्वच्छतागृहांसाठी करतात. पिण्यासाठी पाणीच नसल्याने ही मुले आसपासच्या दुकानांमध्ये जाऊन अथवा परिसरातील विंधन विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. त्यात प्रामुख्याने स्वच्छतागृह नसल्याने मुलींची मोठी कुचंबणा होते. शाळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे आणि खुरटी रोपे वाढली असून त्यामुळे काही शाळांमध्ये आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाच क्रमांकाची शाळा वगळता एकाही शाळेस मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही. या शाळेतील मैदानही खासगी तसेच शासकीय कार्यक्रम आणि सार्वजनिक पार्किंगने व्यापलेले आहे.