खाद्यतेलाने महागाईत ‘तेल’ ओतले; ४० ते ६० रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:16+5:302021-04-01T04:12:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत करडई, सूर्यफुलासह सर्वच खाद्यतेलाचे भाव लिटरमागे ४० ते ६० रुपयांनी ...

खाद्यतेलाने महागाईत ‘तेल’ ओतले; ४० ते ६० रुपयांची वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत करडई, सूर्यफुलासह सर्वच खाद्यतेलाचे भाव लिटरमागे ४० ते ६० रुपयांनी वाढले आहेत. ‘कोरोना’च्या संकटामुळे आधीच सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच आता खाद्यतेलाच्या दरवाढीने महागाईत आणखी तेल ओतले आहे. यामुळे मात्र सर्वसामान्य गृहिणींचे घराचे बजेट मात्र चांगलेच बिघडले आहे.
कोरोनाचे संकट अधिक गंभीर होत असताना पुन्हा लाॅकडाऊनची चर्चा सुरू झाल्याने गेल्या वर्षभराच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. अनेकांची आर्थिक ओढताण होत असतानाच स्वयंपाकघरात रोज लागणारे खाद्यतेलाचा दर आलेख मात्र चढताच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याची मोठी झळ बसत आहे. गेल्या वर्षभरात खाद्यतेलाचे भाव चांगलेच भडकले आहेत.
------
खाद्यतेलाचे दर (प्रतिकिलो)
तेल मार्च २०२१ मार्च २०२०
सूर्यफूल -२४२०/- १७००/-
शेंगदाणा -२३७५/- २१००/-
सोयाबीन -२०६०/- १४००/-
सरकी तेल -२१००/- १४५०/-
-----
तेलाच्या किंमती वाढल्याने बजेट बिघडले
गेल्या वर्षभरात दर महिन्याला तेलाच्या किमंती वाढतच आहे. एका वर्षात प्रथमच ऐवढ्या मोठ्याप्रमाणात दर वाढ झाली आहे, पण यामुळे घराचे महिन्याचे बजेट मात्र बिघडले आहे.
- वैशाली बढे, गृहिणी
--
आंतरराष्ट्रीय बाजार पेठेचा परिणाम
आंतरराष्ट्रीय बाजारात डाॅलरच्या दरामध्ये होणारी घसरण याचा मोठा परिणाम खाद्यतेलाच्या दरावर होत आहे. याशिवाय कोरोना आणि लाॅकडाऊन यामुळे स्थानिक पातळीवर तेलाच्या मिलवर कामगार मिळत नसल्याने देखील काही प्रमाणात दर वाढ झाली आहे.
- सचिन निवगुणे, अध्यक्ष, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ