भामा-आसखेडला गाळाचे ग्रहण
By Admin | Updated: May 10, 2017 03:48 IST2017-05-10T03:48:10+5:302017-05-10T03:48:10+5:30
खास शेतीला पाणीपुरवठा व्हावा, म्हणून बांधण्यात आलेल्या भामा-आसखेड धरणाच्या जलाशयात सध्या गाळ साचण्याचे

भामा-आसखेडला गाळाचे ग्रहण
लोकमत न्यूज नेटवर्क
आंबेठाण : खास शेतीला पाणीपुरवठा व्हावा, म्हणून बांधण्यात आलेल्या भामा-आसखेड धरणाच्या जलाशयात सध्या गाळ साचण्याचे प्रमाण अधिक आणि पाणीसाठा मात्र कमी होत चालला आहे. धरणाची पाणी साठवणक्षमता जरी ८.१४ टीएमसी असली तरी वाढत्या गाळामुळे धरणाच्या साठवणक्षमतेवर परिणाम झाला आहे.
धरणाचे दोन्ही कालवे पूर्ण झाले असते तर धरणाच्या पाण्यावर ३८ हजार १५४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असते. परंतु कालवे न झाल्याने किती क्षेत्र सिंचनाखाली आले, याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे. खेड तालुक्यासह दौंड आणि हवेली तालुक्याला या पाण्याचा फायदा होत असून त्यामुळे तिन्ही तालुक्यांतील जमीन सिंचनाखाली आली आहे.
धरण जरी ८.१४ टीएमसी पाण्याच्या क्षमतेचे असले तरी प्रत्यक्षात मात्र एवढा पाणीसाठा होत नाही. कारण धरणाच्या पाण्याचा फुगवटा हा जवळपास २५ किमीपर्यंत आहे. धरणाच्या क्षेत्रात जवळपास ४० किमी अंतरावरून अन् सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून पाणी वाहत येत असते. हे वाहत येणारे पाणी तीव्र उतारावरून वाहत येत असल्याने पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात माती वाहून येत असून धरणक्षेत्रात गाळ मोठ्या प्रमाणात साचत चालला आहे. त्यामुळे धरणाची खोली कमी होत असून पात्र उथळ होत आहे. याचा परिणाम साठवणक्षमतेवर झाला आहे. हजारो ब्रास मातीसाठा निघेल, अशी स्थिती सध्या या धरणात आहे.