पुण्यात प्रथम मॉन्सूनचे लवकर आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST2021-06-09T04:14:23+5:302021-06-09T04:14:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केरळमध्ये ३ जून रोजी आगमन झालेल्या मॉन्सूनने यंदा पुढील तीनच दिवसांत वेगाने प्रगती करत ...

पुण्यात प्रथम मॉन्सूनचे लवकर आगमन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केरळमध्ये ३ जून रोजी आगमन झालेल्या मॉन्सूनने यंदा पुढील तीनच दिवसांत वेगाने प्रगती करत ५ जून रोजी महाराष्ट्रात आणि ६ जून रोजी पुण्यात प्रवेश केला. गेल्या काही वर्षांतील पुण्यात इतक्या लवकर मॉन्सूनचे आगमन होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यापूर्वी ९ जून २०१८ रोजी मॉन्सून पुण्यात दाखल झाला होता. सर्वसाधारणपणे पुण्यात मॉन्सून हा ८ जूनला दाखल होत असे. हवामान विभागाने गेल्या ३० वर्षांच्या पाहणीनंतर गेल्या वर्षी मॉन्सूनच्या आगमनाच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पुण्यात मॉन्सूनचे आगमन हे आता १० जूनला अपेक्षित आहे. मात्र, यंदा मॉन्सूनने पुण्यात ६ जून रोजी आगमन केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, मॉन्सूनचे आगमन हे केरळच्या दक्षिणकडून दरवेळी होत असते. त्यानंतर तो पहिल्या टप्प्यात कर्नाटकातील कारवारपर्यंत मजल मारत असतो. यंदा सुरुवातीला बंगालच्या उपसागरातील शाखेची वाटचाल काहीशी धिम्या गतीने झाली. त्याचवेळी अरबी समुद्रातील शाखेने जोरदार वाटचाल केली. यंदा मॉन्सूनचे आगमन हे दक्षिणेकडून होण्याऐवजी केरळच्या उत्तरेकडून झाले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जो पूर्वी कारवारपर्यंत येणाऱ्या मॉन्सूनने यंदा पुण्यापर्यंत मजल मारली आहे. आता तो काहीसा कमजोर पडला आहे. पुढील चार दिवस त्यात फारसा बदल होणार नाही. १२ जूननंतर पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
.....
यापूर्वी पुण्यात मॉन्सून दाखल झालेल्या तारखा
६ जून २०२१
१४ जून २०२०
२४ जून २०१९
९ जून २०१८
२० जून २०१६