ई-फेरफार होणार सुलभ व गतिमान
By Admin | Updated: September 4, 2015 02:06 IST2015-09-04T02:06:40+5:302015-09-04T02:06:40+5:30
ई-फेरफार व संगणकीकृत सातबारा प्रणालीमध्ये अनेक त्रुटी असल्याचे कारण देत तलाठ्याकडून याला विरोध होत असतानाच शासनाच्या राष्ट्रीय सूचना

ई-फेरफार होणार सुलभ व गतिमान
पुणे : ई-फेरफार व संगणकीकृत सातबारा प्रणालीमध्ये अनेक त्रुटी असल्याचे कारण देत तलाठ्याकडून याला विरोध होत असतानाच शासनाच्या राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्र (एनआयसी) तयार केलेल्या ‘एक्सपर्ट व्हर्जन’ हे काम अधिक सुलभ व गतिमान पद्धतीने होणार आहे. सध्या पुणे जिल्ह्यात सहा तालुक्यांमध्ये हे काम सुरू झाले असून, एक्सपर्ट व्हर्जनमुळे येत्या दोन महिन्यांत संपूर्ण जिल्ह्यात ई-फेरफार लागू करण्यासाठी अधिक जोमाने काम करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात भोर आणि मुळशी तालुक्यातील सुमारे ९ हजार ५०० फेरफार संगणकीकृत करुन आॅनलाईन टाकण्यात आले. यामध्ये तब्बल ५ हजार फेरफार प्रमाणित झाले असून, ते आता नागरिकांना आॅनलाईन पद्धतीने पाहण्यास उपलब्ध आहेत. तर ३ हजार फेरफारमध्ये काही तांत्रिक अडचणी असून, त्या दुरुस्त करुन आॅन लाईन टाकण्यात येणार आहेत. याशिवाय येत्या दोन दिवसांत बारामती आणि जुन्नर या दोन तालुक्यांमध्ये व दहा दिवसांनंतर मावळ आणि दौंड तालुक्यांमध्ये देखील ई फेरफार सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.
केंद्राच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमातंर्गत राज्य शासनाने राष्ट्रीय भूमी अभिलेख अधुनिकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून सातबारा आॅन लाईन करण्याचे काम सुरु आहे. पुणे जिल्ह्यात भोर तालुका सातबारा संगणकीकरण करणारा राज्यातील पहिला तालुका ठरला आहे. जिल्ह्यात अन्य तालुक्यांमध्ये देखील येत्या दोन महिन्यात ई-फेरफार ची सुविधा उपलब्ध होईल, असे जगताप यांनी सांगितले. परंतु सध्या संगणकीकरणामध्ये अनेक काही अडचणी येत आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने खास तज्ज्ञ व्यक्तींची समिती नियुक्त केली असून, मुळशी आणि भोर तालुक्यात प्रत्यक्ष जाऊन अडचणी व त्रुटी दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच एनआयसीने यावेळी प्रथमच ‘दुरुस्ती’ हा पर्याय दिला असून, सातबारा आॅनलाईन करताना काही चूका झाल्यास त्या पुन्हा दुरुस्त करता येणार आहे. (प्रतिनिधी)