वर्षभरात परस्पर संमतीने झाले १००४ घटस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:11 IST2021-03-15T04:11:30+5:302021-03-15T04:11:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही वर्षांत किरकोळ कारणांमुळे जोडप्यांमधील वाद विकोपाला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याची ...

वर्षभरात परस्पर संमतीने झाले १००४ घटस्फोट
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या काही वर्षांत किरकोळ कारणांमुळे जोडप्यांमधील वाद विकोपाला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याची परिणीती घटस्फोटामध्ये होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनचा काळही त्याला अपवाद ठरलेला नाही. वर्षभरात घटस्फोटासाठी ११९२ दावे दाखल झाले. त्यापैकी परस्पर संमतीने १००४ जणांचे घटस्फोट झाले आहेत. घटस्फोटांचे हे वाढते प्रमाण विवाह व्यवस्थेसाठी चिंतेची बाब बनले आहे.
गतवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जोडप्यांना एकमेकांशी संवाद साधण्याबरोबरच सहवासातून एकमेकांना वेळ देण्याकरिता एक उत्तम संधी मिळाली होती. मात्र, या दिवसांमध्येही एकमेकांचा अहंकार, पगार कपात, नोकरी गेल्यामुळे आलेले नैराश्य, कुटुंबावर झालेला परिणाम, त्यातून वाढत चाललेली वादावादी आणि घरात काम करण्यावरून सातत्याने होणारे शीतयुद्ध याच्या परिणामस्वरूप वकिलांकडे परस्पर संमतीने घटस्फोट मिळण्यासाठीच्या अर्जाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
घर हे दोघांचे असते, एकाने विस्कटले तर दुसऱ्याने ते सावरायचे असते असे म्हटले जाते. गेल्या अडीच वर्षात परस्पर संमतीने घटस्फोट मिळावा याकरिता ३ हजार ३५२ अर्ज दाखल झाले होते. त्यातील १ हजार ९१२ घटस्फोटांचे दावे परस्पर संमतीने निकाली काढण्यात आले. दाव्यांच्या आकडेवारीनुसार घटस्फोटाचे दरररोज ५ दावे न्यायालयात दाखल होत आहेत. दरवर्षी घटस्फोटांसाठी दाखल होणारे दावे हे हजारपर्यंतच्या घरात जातात. मात्र लॉकडाऊनमध्ये या संख्येत वाढ झाली. दिवसागणिक घटस्फोटाच्या अर्जांमध्ये वाढ होणे ही चिंताजनक बाब ठरत आहे.
---
लॉकडाऊन काळात अनेक लोकांच्या विशेषत: आयटीमधील तरुण-तरुणींच्या नोकऱ्या गेल्या. पगार कमी झाला. त्यामुळे प्रापंचिक आणि पैशावरून वाद, मित्र-मैत्रिणींबरोबर चॅटिंग करण्यावरून संशयाचे वातावरण, एकमेकांचा अहंकार, मुलीच्या कुटुंबाचा नको तेवढा हस्तक्षेप यामुळे जोडप्यांमधील वाद विकोपाला जाण्याचे प्रमाण वाढले. या कारणास्तव परस्पर संमतीने घटस्फोट मिळण्यासाठीच्या अर्जात वाढ झाली.
- ॲड. वैशाली चांदणे, अध्यक्ष, फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन
.......
वर्षभरातील घटस्फोटाची आकडेवारी
मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१
* घटस्फोटासाठी दाखल झालेले दावे ११९२
* परस्पर संमतीने झालेले घटस्फोट १००४
* समुपदेशनानंतर नांदायला गेलेली जोडपी ८१