चाकण : महिलेची प्रसुती करताना मुलीच्या अर्भकासह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना चाकण येथे घडली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून तीन डॉक्टरांवर चाकण पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. सपनाच्या मृत्यूनंतर काही काळ नातेवाईक संतप्त झाल्याने काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून हॉस्पिटलजवळ पोलीस बंदोबस्त देण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहिचीनुसार, सपनाला प्रसुतीसाठी डॉ.अरगडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी औषधोपचार करताना अधिक त्रास होऊ लागल्याने महिलेला क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. येथे मात्र प्रसुती करताना अर्भक मुलगी मृत झाली. त्यानंतर सपनाही गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिला तपासण्या पूर्वीच मयत झाली असल्याचे घोषित केले. हलगर्जीपणे उपचार, इंजेक्शन, चुकीच्या गोळ्या व सलाईन दिल्याने सपनाचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूस जबाबदार झाल्याने तिन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ---------------;-