टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमली सोपानगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST2021-01-13T04:26:51+5:302021-01-13T04:26:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सासवड : संत सोपानदेव महाराज संजीवन समाधी सोहळा सोमवारी (दि ११) उत्साहात पार पडला. ...

टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमली सोपानगरी
लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : संत सोपानदेव महाराज संजीवन समाधी सोहळा सोमवारी (दि ११) उत्साहात पार पडला. नामदेव महाराज यांच्या अभंगा मधून केशव महाराज नामदास यांनी संत सोपानदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्याचे वर्णन केले. समोर जमलेला वैष्णवांचा मेळा हे वर्णन ऐकून डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहत होता. आणि जमलेले भाविक गहिवरून गेले. समाधी वर्णानंतर संत सोपान देव महाराजांचा जयघोष झाला. टाळ-मृदूंगाचा अखंड गजर करीत समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली.
क्षेत्र सासवड ( ता. पुरंदर ) येथे संत सोपानदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा सुरु आहे. रविवार(दि १०) सायंकाळी ७ वाजता संत नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज केशव महाराज नामदास यांचे संत नामदेव महाराज यांच्या पादुका घेऊन आगमन झाले. सोमवारी (दि ११) अर्थात मार्गशीर्ष वद्य १३, हा संत सोपानदेव समाधी सोहळ्याचा प्रमुख दिवस असल्याने पहाटे काकडा आरती घेण्यात आली. त्यानंतर संत सोपान देव महाराज समाधी आणि संत नामदेव महाराज पादुका यांचा विधिवत अभिषेक करून महापूजा करण्यात आली. दिंडी प्रमुखांच्या वतीने अभिषेक घालण्यात आले.
सकाळी ९.३० ते ११.३० या वेळात केशव महाराज नामदास (पंढरपूर) यांचे संत सोपानदेव समाधी वर्णनाचे कीर्तन झाले. भाविकानी कीर्तनाचा लाभ घेतला. टाळ - मृदूंगाचा गजर होऊन पुंडलिक वरदे हरी विठ्ठलचा जयघोष झाला आणि दुपारी बरोबर १२ वाजता उपस्थित भाविकांनी समाधीवर पुष्पांचा वर्षाव केला. त्यानंतर आरती घेण्यात आली. यावेळी संत सोपानदेव देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड गोपाळ गोसावी, व्यवस्थापक हिरुकाका गोसावी, त्रिगुण गोसावी, संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, विश्वस्त योगेश देसाई, बाळासाहेब चोपदार, हभप माऊली महाराज, बंडा महाराज कराडकर आदी उपस्थित होते.
चौकट
दुपारी १२ ते २ या वेळात कोकाटे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर दिंडी प्रदक्षिणा घेऊन दहीहंडी फोडण्यात आली. तसेच दुपारी २ वाजता पुरंदर तालुक्यातील नवी मुंबई स्थित रहिवासी असलेल्या अंजीर मंडळाकडून भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. दुपारी ३ ते ४ या वेळात सत्यवती एदलाबादकर यांचे प्रवचन झाले. तर ४ ते ५ या वेळात सासवड येथील महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन संगीताचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी महिन्याचे वारकरी यांच्या वतीने श्री संत नामदेव महाराज यांनी रचलेल्या सोपान महाराज यांच्या समाधी वर्णनाचे अभंग घेण्यात आले. रात्री बाळकृष्णबुवा दिंडीचा जागरचा कार्यक्रम झाला.
फोटो : सासवड येथे संत सोपानदेव समाधी सोहळा प्रसंगी समाधी वर्णनाचे कीर्तन झाले