थकीत पाणीपट्टीमुळे १४ गावांचे पाणी बंद
By Admin | Updated: February 11, 2016 03:05 IST2016-02-11T03:05:13+5:302016-02-11T03:05:13+5:30
येथील उदमाई संयुक्त पाणीपुरवठा व देखभाल समितीच्या साठवण तलावातून १४ गावांतील वाड्यावस्त्यांना केला जाणारा पाणीपुरवठा थकीत पाणीपट्टीमुळे बंद

थकीत पाणीपट्टीमुळे १४ गावांचे पाणी बंद
कुरवली : उद्धट (ता. इंदापूर) येथील उदमाई संयुक्त पाणीपुरवठा व देखभाल समितीच्या साठवण तलावातून १४ गावांतील वाड्यावस्त्यांना केला जाणारा पाणीपुरवठा थकीत पाणीपट्टीमुळे बंद आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसांपासून ही गावे पाण्याअभावी तहानलेली आहेत.
या ठिकाणाहून कुरवली, तावशी, उदमाईवाडी, घोलपवाडी, उद्घट, जांब, चिखली, पवारवाडी, थोरातवाडी, मानकरवाडी या गावांसह वाड्यावस्तींना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या भागातील ग्रामपंचायतकडे लाखो रुपये थकीत पाणीपट्टी आहे. त्यामुळे सात दिवसांपासून पाणीपुरवठा बंद केल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी धावपळ सुरू आहे.
संबंधित गावातील ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकांनी सांगितले की, थकीत बिलापैकी
काही रक्कम जमा केली आहे.
थकीत बिले लवकर भरण्याची
हमी देऊन पाणीपुरवठा सुरू
करण्याची मागणी करण्यात
आली. मात्र, त्याबाबत समितीने नकार दिला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव माने यांनी पाणीपुरवठा समिती हिशोबाच्या गोंधळाबाबत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागविली आहे.
देखभाल समितीविरोधात त्यांनी एल्गार पुकारला आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना माने यांनी सांगितले की, या पाणीपुरवठा योजनेत अनेक त्रुटी आहे. आर्थिक बाबतीत सावळा गोंधळ आहे. मुख्य लाईनवर ठिकठिकाणी मनमानी पद्धतीने नळजोड दिले आहेत.
त्यांच्या पाणीपट्टी वसुलीबाबतीत तसेच ग्रामपंचायत यांना पाणीबिले आकारण्यात आली आहेत. त्यामध्ये देखील गैरव्यवहार झाल्याची तक्रार आहे. वसुलीबाबतीतही मोठा गैरव्यवहार झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
(वार्ताहर)