दहा हजार क्युसेक्सला देणार धोक्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 01:03 IST2016-05-22T01:03:13+5:302016-05-22T01:03:13+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेने विठठलवाडी ते वारजेला जोडणारा नदीपात्रातील रस्ता उखडून टाकला आहे.

Due to warnings given to 10,000 cusx | दहा हजार क्युसेक्सला देणार धोक्याची सूचना

दहा हजार क्युसेक्सला देणार धोक्याची सूचना

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेने विठठलवाडी ते वारजेला जोडणारा नदीपात्रातील रस्ता उखडून टाकला आहे. या रस्त्यासाठी टाकण्यात आलेला मातीचा बंधारा काढण्यात आल्याने या परिसरातील जवळपास दहाहून अधिक सोसायटया थेट नदीपात्रातच आल्या आहेत. त्यामुळे अवघ्या १५ हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यात आल्यानंतरही या सोसायटयांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता लक्षात घेऊन १0 हजार क्यूसेक्स पाणी सोडताच या परिसरात धोक्याची सूचना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या शिवाय या परिसरासाठी आपत्ती निवारणासाठी विशेष यंत्रणा उभारण्याबाबत कामही सुरू करण्यात आले आहे. रस्ता उखडण्यापूर्वी धरणातून पाणी सोडल्यानंतर सुमारे ५0 हजार क्यूसेक्सच्या पुढे या परिसरात पाणी घुसत होते. मात्र, आता १५ हजार क्यूसेक्सलाच पाणी घुसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.या वर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत जादा पाणी झाल्यानंतर हे पाणी मुठा नदीतून सोडण्यात येते. हे पाणी मोठ्या प्रमाणात नदीकाठी बांधण्यात आलेल्या सोसायट्यांमध्ये घुसते. सर्वात प्रथम हे पाणी पुणे- बंगळुरू महामार्गावरील वारजे येथील उड्डाणपुलापासून विठ्ठल मंदिरापर्यंत असलेल्या सोसायट्यांमध्ये घुसते.
२00९ आणि २0११ मध्ये आलेल्या पुरात जवळपास २५ ते ३0 सोसायट्यांमध्ये हे पाणी घुसले होते. या वेळी या धरणांमधून ५0 हजार क्युसेक्सहून अधिक पाणी सोडण्यात आलेले होते. मात्र, त्या वेळी नदीपात्राच्या बाजूला संरक्षक भिंत असतानाही हे पाणी घुसले होते. या वर्षी न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेने रस्त्यासाठी बांधलेली ही संरक्षक भिंत पूर्णपणे काढली असून, या ठिकाणी असलेली मातीही काढण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक सोसायट्या नदीपात्रातच आलेल्या आहेत. परिणामी १५ हजार क्युसेक्सपेक्षा
अधिक पाणी सोडताच काही सोसायट्यांमध्ये लगेच पाणी घुसणार आहे.
ही बाब लक्षात घेऊन खडकवासला धरणातून १0 हजार क्युसेक्स पाणी सोडताच या सोसायट्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका आणि पाटबंधारे विभागाकडून संयुक्त यंत्रणा उभारली जाणार असून, नागरिकांना ध्वनिक्षेपक, एसएमएस तसेच प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना सोसायट्यांमध्ये पाठवून सावधानतेचा इशारा दिला जाणार आहे. रस्ता उखडून काढल्याने या परिसरात सर्वाधिक पुराचा धोका आहे. ही बाब लक्षात घेऊन पुढील काही दिवसांत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून या परिसराची पाहणी केली जाणार असून, नागरिकांना मदतीसाठी २४ तास कार्यरत असलेला मदतकक्ष स्थापन केला जाण्याची शक्यता आहे. यात प्रामुखाने रबर बोटी, पाणी खेचणाऱ्या पंपासह मदतीसाठी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी असतील. या भागासाठी महापालिकेकडून टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला जाणार आहे.

Web Title: Due to warnings given to 10,000 cusx

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.