पुणे: महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी शासनाने जाहीर केलेली बहुसदस्यीय (चार सदस्यीय) प्रभागरचना ही असंवैधानिक आणि लोकशाहीला धक्का देणारी आहे, असे मत माजी खासदार ॲॅड. वंदना चव्हाण यांनी नोंदवले आहे.
ॲॅड. चव्हाण म्हणाल्या, संविधानातील कलम २४३ आर नुसार प्रत्येक प्रभागातून एकच प्रतिनिधी निवडला गेला पाहिजे. एक व्यक्ती एक प्रतिनिधी एक प्रभाग हा लोकशाहीचा आत्मा आहे. बहुसदस्यीय प्रभागांमुळे नागरिकांचे थेट प्रतिनिधित्व हरवते, जबाबदारी कमी होते आणि स्थानिक स्वराज्य कमजोर होते. बहुसदस्यीय प्रभागांमध्ये मोठ्या प्रभागांमुळे नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी नेमके कोणत्या नगरसेवकाकडे जावे, हे समजत नाही. जबाबदारीची जाणीव पुसट होते आणि पर्यायाने उत्तरदायित्व कमी होते. त्यामुळे लोकसेवा आणि विकासकामे अडकतात. स्वतंत्र उभे राहण्याची इच्छा असेल त्या व्यक्तीला ही रचना अन्यायकारक ठरते. स्थानिक पातळीवरील लोकसहभाग आणि उत्तरदायित्व धोक्यात येते. महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग योजना रद्द करून एकसदस्यीय प्रभाग पद्धती पुनर्स्थापित करावी, अशी मागणी ॲॅड. चव्हाण यांनी केली आहे.