ढिसाळ नियोजनामुळे भाविकांना त्रास
By Admin | Updated: August 17, 2015 02:52 IST2015-08-17T02:52:52+5:302015-08-17T02:52:52+5:30
श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये १५ आॅगस्ट व रविवार तसेच श्रावणातील पहिलाच दिवस अशा दोन दिवस लागून आलेल्या सुटीच्या दिवशी पर्यटकांचा महापूर

ढिसाळ नियोजनामुळे भाविकांना त्रास
भीमाशंकर : श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये १५ आॅगस्ट व रविवार तसेच श्रावणातील पहिलाच दिवस अशा दोन दिवस लागून आलेल्या सुटीच्या दिवशी पर्यटकांचा महापूर ओसंडून वाहत होता. भीमाशंकरमध्ये पहिल्यांदाच एवढी गर्दी झाल्याचे स्थानिक दुकानदार सांगत होते. एसटी महामंडळाच्या ढिसाळ व मनमानी कारभारामुळे भाविकांना सुमारे चार किलोमीटर पायी जावे लागले; तसेच अपुरा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे मोजक्या पोलिसांवर ताण आला.
शनिवार व रविवार हे दोन दिवस मंचर-भीमाशंकर व राजगुरुनगर-भीमाशंकर हे दोन्ही रस्ते भरून वाहत होते. रस्त्यावर गाडीला गाडी चिकटून चालली होती. मंचर, घोडेगाव, शिनोली, डिंभा, तळेघर, राजगुरुनगर, वाडा, डेहणे या गावांमध्ये वाहतूक कोंडी होत होती. शनिवारी तेरूंगण फाट्यापासून; तर भीमाशंकरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. पाच किलोमीटर गाडी काढण्यासाठी सुमारे तीन तास गेले. रस्त्यावर एवढी वाहने होती, की पायी चालणेही यामुळे कठीण झाले होते, तर रविवारी सकाळपासून भीमाशंकरकडे मोठ्या संख्येने वाहने जात होती. सकाळी ११ वाजताच वाहनतळे पूर्ण भरून गेली होती.
निगडाळे ते भीमाशंकर हा रस्ता छोटा असल्यामुळे एसटी व मोठ्या लक्झरी गाड्या शिवप्रसाद हॉटेलजवळ थांबवल्या जातील व तेथून एसटी महामंडळाच्या मिनी बसने भीमाशंकरपर्यंत नेले जाईल. संपूर्ण श्रावण महिन्यातील सोमवार व सुटयांच्या दिवशी एसटी महामंडळ ४० जागा मिनी बस ठेवले, असे बैठकीत नियोजन ठरले होते. मात्र शनिवारी १५ आॅगस्टच्या दिवशी सकाळी एकही मिनी बस येथे आली नाही. त्यामुळे एकच गर्दी झाली. लोकांना चार किलोमीटर पायपीट करीत जावे लागले. संतापलेल्या काही भाविकांनी रस्ता रोखून धरला. सकाळी ११ वाजता दोन मिनी बस आल्या, मात्र या मिनी बस पुरणाऱ्या नव्हत्या. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी परिस्थितीची कल्पना देऊनही त्यांनी मनमानी केल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली, लोकांची रेटारेटी, गर्दी झाली. (वार्ताहर)ह