शिक्षकाला नोटीस आल्याने ग्रामस्थांनी शाळाच पाडली बंद

By Admin | Updated: August 11, 2015 03:41 IST2015-08-11T03:41:08+5:302015-08-11T03:41:08+5:30

विद्यार्थ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये लोकप्रिय शिक्षकाला, ‘आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई करून वरिष्ठ कार्यालयाकडे निलंबनाचा प्रस्ताव का पाठवू नये,’ अशी कारणे दाखवा नोटीस आल्याने ते जागीच कोसळले.

Due to the notice issued to the teachers, the villagers stopped the school | शिक्षकाला नोटीस आल्याने ग्रामस्थांनी शाळाच पाडली बंद

शिक्षकाला नोटीस आल्याने ग्रामस्थांनी शाळाच पाडली बंद

जेजुरी : विद्यार्थ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये लोकप्रिय शिक्षकाला, ‘आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई करून वरिष्ठ कार्यालयाकडे निलंबनाचा प्रस्ताव का पाठवू नये,’ अशी कारणे दाखवा नोटीस आल्याने ते जागीच कोसळले. मात्र, ग्रामस्थांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून शाळाच बंद पाडली. शाळेचे मुख्याध्यापक सुनील नेवसे आणि केंद्रप्रमुख सतीश कुदळे यांची त्वरित बदली करून त्यांच्यावरच कारवाई करावी; अन्यथा शाळा बंद ठेवू, असा इशारा दिला आहे.
पुरंदर तालुक्यातील राख या गावात हा प्रकार घडला. उपशिक्षक अजित रामचंद्र पाटोळे असे त्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांना विद्यार्थ्यांकडून ग्रामस्थांच्या मदतीने त्वरित उपचारांसाठी नीरा येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, या घटनेने संपूर्ण गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
या संदर्भात अधिक माहिती अशी : येथील जिल्हा परिषद शाळेत आज सकाळी १० वाजता उपशिक्षक पाटोळे आले असता, त्यांना पुरंदर गटशिक्षणाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस मिळाली. नोटीस वाचताच पाटोळे त्यांच्या छातीत दुखू लागल्याने ते जमिनीवर कोसळले. विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना उपचारांसाठी हलवले. मात्र, या प्रकाराने ग्रामस्थ संतापले.
असे का झाले, याची माहिती घेतली असता सदर नोटीस ग्रामस्थांच्या हातात पडली. नोटीस पाहून ग्रामस्थ अधिकच भडकले. गावातील पुरुष, महिला, माजी विद्यार्थी आदी शे-दीडशेचा जमाव शाळेत आला. त्यांनी शाळाच बंद पाडली. नोटिशीतील आरोप खोटे असल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखाला धारेवर धरले. जोपर्यंत मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची बदली करून त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.
केंद्रप्रमुख सतीश कुदळे यांनी ग्रामस्थांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन ‘उद्यापासून मी स्वत: या शाळेत येणार नाही तसेच मुख्याध्यापकांनीही उद्यापासून पुरंदर पंचायत समिती कार्यालयात पुढील आदेश येईपर्यंत थांबावे. ग्रामस्थांनी मात्र शाळा बंद ठेवू नये,’ असे आवाहन केले. तर, पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी राजे लोंढे यांनी ‘एखाद्या शिक्षकाला नोटीस देणे, हा व्यवस्थापनाचा भाग आहे. यामुळे कोणाचे निलंबन झाले, असे होत नाही. आपण कोणावरही चुकीची कारवाई होऊ देणार नाही; मात्र कोणीही व्यवस्थेला वेठीस धरणेही योग्य नाही. सध्या पुरंदरमध्ये पंचायत राज समितीचा दौरा आहे. संपूर्ण यंत्रणा त्या दौऱ्यात अडकली आहे. दौरा संपल्यानंतर आपण स्वत: लक्ष घालून योग्य ती कारवाई करू,’ असे सांगितले. यावर ग्रामस्थांनी ‘गटशिक्षणाधिकारी कोणावरही चुकीची कारवाई होऊ देणार नाही, असे म्हणतात; मग कोणतीही शहानिशा न करता केवळ केंद्रप्रमुखाच्या अहवालावरून लगेच अशा प्रकारची नोटीस ते काढू शकतात का?’ असा सवाल केला.
मुख्याध्यापकाने आमच्या शाळेचे अक्षरश: वाटोळे चालवले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शंकर रणनवरे, बापूराव रणनवरे, मनोज रणनवरे, शेखर रणनवरे, रोहित पालव, रियाज शेख, शुभम सोनवणे, राहुल पवार, विकी रणनवरे, गोरख रणनवरे, मयूर रणनवरे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे. केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक यांची त्वरित बदली करावी. या प्रकरणाची ग्रामस्थांच्या उपस्थिती जाहीर चौकशी करावी व दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)

तक्रारींचा वाचला पाढा
घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता, ग्रामस्थांनी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखाच्याच तक्रारींचा पाढा वाचला. शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अंजना दशरथ चव्हाण यांनी, मुख्याध्यापक नेवसे यांनी आतापर्यंत एकही समितीची बैठक घेतली नाही. पालक सभाही बोलावलेली नाही. बैठक झाल्याचे सांगून माझ्या सह्या घेतल्या आहेत. विनापरवाना खर्चही केला, असा आरोप केला आहे. केंद्रप्रमुख तर कधीही केंद्रशाळा असूनही येत नाहीत. त्यांच्याकडून पोटोळेंसारख्या चांगल्या शिक्षकाला सतत मानसिक त्रास दिला जात आहे.त्यांना मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख मानसिक त्रास देत आहेत, असेही चव्हाण यांनी सांगितले.

मुख्याध्यापकांनी व केंद्रप्रमुखांनी शाळेबरोबरच गावही बदनाम केला आहे. आज ही घटना सकाळी घडली. मुख्याध्यापक दुपारी १२ वाजता शाळेत आले. त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे.
- नंदकुमार रणनवरे,
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष


आम्ही ग्रामस्थ वर्गणी करून शाळेला मदत करतो; मात्र मुख्याध्यापक शाळा सोडून इतरत्र फिरत असतात. शाळेच्या बाबतीत त्यांचे अजिबात लक्ष नाहीच; मात्र कधीही वर्गात जाऊन शिकवत नाहीत.
-रत्नाकर रणनवरे,
ग्रामस्थ

Web Title: Due to the notice issued to the teachers, the villagers stopped the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.