पुणे: पुण्यात मद्यधुंद तरुणाचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात रस्त्यावरच अश्लील चाळे करण्याची हिम्मत या तरुणांनी केली आहे. आज सकाळी हे प्रकरण समोर आल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात पुणे नगर रोडवर हा प्रकार घडला आहे. दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून थांबले आहेत. त्यापैकी एक तरुण गाडीतून उतरून रस्त्यावरच लघुशंका करताना व्हिडिओमधून दिसत आहे. तसेच त्यावेळी त्याने रस्त्यावरच स्त्रियांसमोर अश्लील चाले केल्याचे दिसून आले आहे. तर गाडीत बसलेल्या दुसऱ्या तरुणाच्या हातात दारुची बाटली आहे. दोघेही हुल्लडबाजी करताना दिसून येत आहेत. आजुबाजुच्या लोकांनी जाब विचारला असता ते फुल स्पीड मध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेल्याचे दिसते आहे.
पुण्याच्या रस्त्यावर अजूनही तरुण बिनधास्तपणे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत आहेत. पोर्शे प्रकरणानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली होती. मात्र आता ती थंडावल्याने पुन्हा एकदा अशा तरुणांची हिम्मत वाढल्याचे चित्र आहे. मद्यधुंद अवस्थेत हे तरुण अतिशय वेगाने वाहन चालवत असल्याचे दिसते आहे. यामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अपघात झाल्यास एखाद्या निष्पाप बळी जाण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लाक्ष लागून आहे.