- किरण शिंदे
पुणे :मुंबईपोलिसांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्कर ललित पाटीलचा ताबा पुणेपोलिसांनी घेतल्यानंतर आता ललितकडून धक्कादायक माहिती समोर येत आहे. ललित पाटीलच्या नाशिकमधील कारखान्यात आतापर्यंत तयार झालेले मेफेड्रोन (एमडी) मुंबईत विकल्याचे ललित पाटीलने सांगितल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ललित पाटीलने उभारलेला नाशिकमधील कारखाना 9 ते 10 सुरू होता. त्यात दरमहा 200 किलो ड्रग्ज तयार केले जायचे. या संपूर्ण प्रकरणात ड्रग्स तयार करण्यात अरविंदकुमार लोहरे मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. लोहरे हा महाड, रांजणगाव गुन्ह्यात देखील आरोपी आहे. आता पुण्यातील गुन्ह्यातही त्यानेच ड्रग्ज तयार करण्याचा फॉर्म्युला दिल्याचे समोर आले आहे.
दरम्यान नाशिकमध्ये सुरू झालेल्या ड्रग्स कारखान्यात दर महिन्याला 200 किलोच्या जवळपास ड्रग्जचे उत्पादन व्हायचे. तयार झालेल्या ड्रग्जचा पुरवठा भूषण व अभिषेक करायचे. तर व्यवहार करण्याचे काम ललित करायचा. आरोपी इम्रान उर्फ अमीर शेख हा ड्रग्ज मुंबईत घेऊन जायचा. इम्रान हे ड्रग्ज त्याच्या खालील 6 डीलरला विक्री करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ललित गँगने आतापर्यंत उत्पादन केलेले सर्व ड्रग्जचा साठा हा मुंबईत विकला गेल्याचे समोर आले आहे.
पुण्यातील ड्रग्स डिलिव्हरी फसली -
ललित गँग यापूर्वी मुंबई शहरातच ड्रग्जचा पुरवठा केला होता. पुण्यात पहिल्यांदाच ते ड्रग्जची विक्री करणार होते. पुण्यात ड्रग्ज विक्रीसाठी भूषणने नकार दिला होता मात्र ललित यासाठी आग्रही होता. परंतु पुणे पोलिसांनी विक्री होण्याआधीच ड्रग्जचे रॅकेट उघडकीस आणले.
दरम्यान पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या ताब्यातून ललित पाटील याला अटक केली. त्याला न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस त्याच्याकडे आता कसून तपास करत आहेत. त्यातून एक एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.