पुणे : गेल्या दोन दिवसांमध्ये पुणे शहरात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. लोहगाव ३९.२ अंश सेल्सिअसवर गेले होते. तर किमान तापमान हे १७ अंशावर होते. पण आज अचानक तापमानात घट झाली असून, सकाळी हवेत गारठा जाणवला. सकाळी किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तापमानात चढ-उतार होतच राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला.केवळ पुण्यातील नव्हे तर राज्यातील कमाल व किमान तापमान घटल्याचे पहायला मिळत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे हवामानात गारठा पसरला आहे. कोकणामध्ये मात्र उष्ण आणि दमट हवामान कायम आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे आज सकाळी पुण्यात गारठा जाणवला. तसेच राज्यातील बहुतांशी भागामध्ये सकाळच्या किमान तापमान घट जाणवली. तापमानातील चढ उतार कायम राहणार असून, कोकणात पुढील ५ दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे.दरम्यान, कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. पुण्यात एकीकडे कमी किमान तापमान नोंदवले जात असताना दुसरीकडे वडगावशेरी, मगरपट्टा, कोरेगाव पार्क या भागात मात्र ते अधिक नोंदले गेले. शिवाजीनगरला १३.४ तर वडगावशेरीला २१.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दोन्ही भागातील तापमानात ७ अंशाचा फरक पहायला मिळत आहे. हा परिणामी स्थानिक पातळीवरील विविध कारणांचा असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.पुण्यातील किमान तापमान :तळेगाव : १२.०माळीण : १२.१हवेली : १२.५शिरूर : १२.९शिवाजीनगर : १३.४एनडीए : १३.५पाषाण : १४.१कोरेगाव पार्क : १९.२मगरपट्टा : २१.५वडगावशेरी : २१.९
किमान तापमानात घट, पुण्यात अचानक गारठा..! तापमानामध्ये चढ-उतार राहण्याचा अंदाज, कमाल तापमानही घसरणार
By श्रीकिशन काळे | Updated: March 6, 2025 16:56 IST