पारुंडेत विकासकामांवर मलमपट्टी
By Admin | Updated: September 18, 2015 01:44 IST2015-09-18T01:44:47+5:302015-09-18T01:44:47+5:30
तालुक्यातील श्रीक्षेत्र पारुंडे येथील कुंभमेळा चार दिवसांवर आला असून आता विकासकामांची ‘लगीनघाई ’ सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून शासनाचा निधी हळूहळू का होईना येत आहे.

पारुंडेत विकासकामांवर मलमपट्टी
- अतुल परदेशी, जुन्नर
तालुक्यातील श्रीक्षेत्र पारुंडे येथील कुंभमेळा चार दिवसांवर आला असून आता विकासकामांची ‘लगीनघाई ’ सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून शासनाचा निधी हळूहळू का होईना येत आहे. मात्र, प्रशासनाने अगदीच कुंभमेळा तोंडाशी आल्यावर घाईघाईने या कामांना सुरुवात केली आहे. मात्र त्याच्या दर्जाविषयी शंका उपस्थित होत असून मलमपट्टी सुरू असल्याचे स्थानिकांचे मत आहे.
दर बारा वर्षांनी कुंभमेळा येत असेल, तर या कामांना आधी वेळ नव्हता की काय, असे अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत. या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य जनतेला मिळणार की नाही?
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जी.बी.पोहेकर यांना विचारले असता, सुरू
असलेल्या कामांचा दर्जा चांगला असून जी अपूर्ण कामे आहेत ती २0 स्पटेंबरपर्र्यत पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले.
आॅगस्टमध्ये जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पारुंडे गावास भेट दिली होती. सुरू असलेल्या व अपूर्ण असलेल्या कामांची पाहणी करून उर्वरित कामे सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या होत्या. त्या वेळी त्यांच्यासमवेत प्रांत कल्याण पांढरे, जिल्हा नियोजन अधिकारी, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, तहसीलदार पी. एन. हिरामणी, जुन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उपस्थित होते.
मात्र, सप्टेंबर महिना अर्धा संपला असून, दोन दिवसांवर पारुंडे येथे कुंभमेळा येऊन ठेपला आहे. असे असताना अजूनही कामे पूर्ण झाली नाहीत. सध्या येथे कामाची नुसती धांदल चालली आहे. याकडे शासनाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष आहे की नाही? की नुसतेच काम करायचे म्हणून करायचे, असा फंडा येथे वापरला जातोय, असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत.
अजूनही गावातील काही अंतर्गत रस्ते अपूर्ण असून, ज्या रस्त्याचे काम झाले आहे किंवा ब्रह्मनाथ मंदिरासमोरील मोकळ्या जागेत ज्या ठिकाणी साधू-संतांच्या राहण्यासाठी तंबू उभारण्यात येणार आहे त्या ठिकाणी करण्यात आलेले काँक्रीटीकरण मलमपट्टी लावल्यासारखे करण्यात आले आहे. त्याठिकाणच्या पूर्वीच्या फरशीवर व मातीवरच काँक्रीटीकरण करण्यात आले असल्याने कामाच्या दर्जाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष आहे.
कामे वेळेत व दर्जेदार होणार का?
रस्ते, सभामंडप, साधूनिवास, भोजनव्यवस्था, स्वयंपाक कक्ष, बंदिस्त गटार, नळ पाणीपुरवठा, परिसर सुशोभीकरण अशी अनेक कामे येथे सुरू असून, वास्तविक ती पूर्ण व्हायला हवी होती. पण आता यातील ठरावीक कामे सुरू असली, तरी बाकीच्या कामांचे काय? अंदाजे साडेपाच कोटी रुपये निधी येथे मंजूर झाला, पण त्याचा संपूर्ण उपयोग झाला की नाही, यात साशंकता व्यक्त होत आहे.
याशिवाय सुमारे सव्वा कोटी रुपये निधी खासदार आढळराव-पाटील, आमदार नीलम गोऱ्हे, जिल्हा परिषद शिवसेना गटनेत्या आशा बुचके यांनी वेगवेगळ्या योजनांमधून उपलब्ध करून दिला आहे. जेवढा निधी आहे त्या स्वरूपात कामे मात्र दिसत नाहीत. अशा वेळी कुंभमेळा आहे तोपर्यंतच कामे होणार का? त्या कामांचा दर्जा उत्तम असणार का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
येथील विकासकामांबाबत प्रशासन गतिमान आहे. त्यांची कामे चांगली सुरू आहेत. मात्र स्थानिकांच्या गटबाजीमुळे ही कामे करण्यात अडथळे येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी येथील कामांबाबत चांगली भूमिका घेतली. मात्र येथील काही लोकांनी अडथळे आणल्याने कामांना उशीर होत आहे.
-आशा बुचके,
जिल्हा परिषद सदस्या
जे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे, त्याला उशीर होण्यास ग्रामस्थांचा आडमुठेपणा कारणीभूत आहे. मात्र, त्या
व्यतिरिक्त ज्या कामांना उशीर झाला किंवा कामांच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्याला प्रशासन आणि ठेकेदारही तेवढेच जबाबदार आहेत.
- जयेश पुंडे,
उपसरपंच