पे अँड पार्कचा खिशावर डल्ला

By Admin | Updated: March 25, 2015 00:24 IST2015-03-25T00:24:39+5:302015-03-25T00:24:39+5:30

पे अँड पार्कच्या नावाखाली दुचाकी तसेच चारचाकी पार्किंगसाठी दुप्पट शुल्क आकारले जात असल्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.

Drawn at the pay and park pocket | पे अँड पार्कचा खिशावर डल्ला

पे अँड पार्कचा खिशावर डल्ला

२पुणे : पे अँड पार्कच्या नावाखाली दुचाकी तसेच चारचाकी पार्किंगसाठी दुप्पट शुल्क आकारले जात असल्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत नागरिकांनी तक्रारी करून ठेकेदारांवर मेहेरनजर असलेले महापालिका प्रशासन मात्र केवळ कारवाईच्या वल्गना करीत आहेत. त्यामुळे महापालिका नागरिकांच्या हितासाठी आहे, की त्यांना लुटणाऱ्या ठेकेदारांच्या हितासाठी असा सवाल उपस्थित होत आहे.
शहरातील महापालिकेने बांधलेली तसेच नाट्यगृहांच्या परिसरातील वाहनतळे ठेकेदारी पद्धतीने चालविण्यास देण्यात आली आहेत. मात्र, त्या ठिकाणी पालिकेने केलेल्या घालून दिलेल्या दरांना हरताळ फासत चक्क दुप्पट वसुली केली जात आहे. विशेष म्हणजे पालिकेस या ठेकेदारांकडून छापील दोन रुपयांच्या पावत्या दाखवून प्रत्यक्षात पाच ते दहा रुपये वसूल केले जात आहेत.
नाट्यगृहांच्या ठिकाणी लूटमार
महापालिकेकडून नाट्यगृहाच्या ठिकाणी चालविण्यास देण्यात आलेल्या पार्किंगच्या ठिकाणी आलेल्या सर्वसामान्यांची दुप्पट दर आकारून लूट केली जात असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिर आणि गणेश कला, क्रीडा रंगमंच या ठिकाणी पार्किंगचा ठेका देण्यात आला आहे. त्या ठिकाणी दुचाकी वाहनांसाठी तीन तासाला दोन रुपये दर निश्चित करण्यात आला आहे; तर इतर ठिकाणी तासाला दोन रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, या बालगंधर्व रंगमंदिराच्या पार्किंगला पाच रुपये, तर गणेश कला येथे चक्क दहा रुपये आकारले जात आहेत.
विशेष म्हणजे ‘बालगंधर्व’च्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नाटके तसेच कलादालनात सर्वाधिक प्रदर्शने होतात.
त्यामुळे मोठी वर्दळ असते; तर गणेश कला मंचच्या ठिकाणी मोठे सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच बचत गटांची प्रदर्शने होतात. त्यामुळे या ठिकाणी आलेल्या नागरिकांना नाईलाजास्तव जादा शुल्काची पावती फाडावी लागते. याबाबत काहींनी पालिकेकडे तक्रारीही दाखल केल्या. मात्र त्यानंतर त्याचे काहीच झालेले नाही, अशी माहिती नागरिकांनी दिली.(प्रतिनिधी)

४करार करून पार्किंग ठेकेदारास दिल्यानंतर त्या ठिकाणी आकारल्या जाणाऱ्या शुल्काची तपासणी तसेच नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेण्याची जबाबदारी भूसंपादन विभागाची आहे. मात्र, अद्याप एकाही ठेकेदारावर कारवाई होत नसल्याने प्रशासन झोपले की काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत; तर करारानंतर महापालिकेचे काम संपले का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

महापालिकेने चालविण्यास दिलेल्या पार्किंगसाठी दोन रूपयांचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मात्र, त्यापेक्षा जादा शुल्क आकारले जात असेल तर ही बाब चुकीची आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी असे प्रकार सुरू आहेत. त्यांना नोटिसा बजावून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- सतीश कुलकर्णी,
भूसंपादन आणि व्यवस्थापन विभागप्रमुख

Web Title: Drawn at the pay and park pocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.