निष्क्रियतेच्या दहा वर्षाला डीपीतील भ्रष्टाचाराचे उत्तर
By Admin | Updated: January 29, 2017 04:21 IST2017-01-29T04:21:46+5:302017-01-29T04:21:46+5:30
महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाच्या वतीने प्रचारासाठी राष्ट्रवादीवर टीका म्हणून

निष्क्रियतेच्या दहा वर्षाला डीपीतील भ्रष्टाचाराचे उत्तर
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाच्या वतीने प्रचारासाठी राष्ट्रवादीवर टीका म्हणून निष्क्रियतेची दहा वर्षे असे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारने जाहीर केलेल्या विकास आराखड्याचे पोस्टमार्टेम करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस गेली सलग १० वर्षे महापालिकेत सत्तेमध्ये आहे. त्याचाच आधार घेत भाजपाची निष्क्रियतेची १० वर्षे हे प्रदर्शन आयोजित केले आहे. वाहतुकीची कोंडी, बसखरेदीत आलेले अपयश, बीआरटीची दुरवस्था, खड्डेयुक्त रस्ते, अनियमित व अपुरा पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापनातील अपयश, डेंगी, स्वाइन फ्ल्यू अशा साथरोगांनी घातलेले थैमान, मनपा रुग्णालयातील गैरसोयी, शिक्षण मंडळातील भ्रष्टाचार अशा विषयांची शंभरहून अधिक छायाचित्रे व कात्रणांचा प्रदर्शनात समावेश आहे. रविवारी (ता. २९ जानेवारी) सकाळी ११ वाजता पक्षाच्या जंगली महाराज रस्त्यावरील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाच्या आवारात या प्रदर्शनाचे उद््घाटन होणार आहे. मंगळवार (ता. ३१ जानेवारीपर्यंत) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल, असे पक्षाने कळविले आहे.
याला उत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या विकास आराखड्याचे पोस्टमार्टेम करण्यात येणार आहे. याविषयी सांगताना अजित पवार म्हणाले, ‘‘पुणे शहराचे भविष्यच या आराखड्याने धोक्यात आणले आहे. मेट्रो, बीआरटी यांच्या बाजूला एफएसआय, टीडीआर यांची खैरात करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या उंच इमारती उभ्या राहतील त्याचा फार मोठा ताण नागरी सुविधांवर येणार आहे, त्याचा काहीही विचार या आराखड्यात केलेला नाही. नागरिकांच्या हितासाठी दवाखाने, मैदाने, उद्याने अशी आरक्षण ठेवण्यात आली होती, ती उठविण्यात आली आहेत. या सगळ्या गोष्टी जनतेसमोर मांडण्यात येणार आहेत.’’(प्रतिनिधी)
पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी; तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी या आराखड्याचा अभ्यास केलेला आहे. त्यावरून काही विशिष्ट लोकांच्या हितासाठी तो तयार करण्यात आला असल्याचे स्पष्ट दिसते.
शहराचा विचार त्यात करण्यात आलेला नाही. या सर्व
गोष्टी पक्षाच्या वतीने मतदारांना सांगण्यात येतील, असे
पवार म्हणाले.