महिलांना दूर्लब समजू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:28 IST2021-01-13T04:28:16+5:302021-01-13T04:28:16+5:30
पुणे : महिला या ऊर्जाचा स्रोत असल्याने त्यांना दुर्बल समजू नका. महिलांनी कुटुंबाची काळजी घेत, सर्व क्षेत्रात आपला ठसा ...

महिलांना दूर्लब समजू नका
पुणे : महिला या ऊर्जाचा स्रोत असल्याने त्यांना दुर्बल समजू नका. महिलांनी कुटुंबाची काळजी घेत, सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवला पाहिजे, तसेच कोणतीही महिला पुरुषासमोर पैशासाठी हात पसरविणार नाही, अशी आर्थिक स्थिती देशात निर्माण करावी, असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या ऑनलाइन राष्ट्रीय महिला संसदेच्या उद्घाटन प्रसंगी उमा भारती बोलत होत्या. या प्रसंगी राज्यस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री देवाश्री चौधरी, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय आदिवासी कामकाज राज्यमंत्री रेणुका सिंग, सुप्रसिद्ध नृत्यंगना डॉ.मल्लिका साराभाई, मुकुल माधव फाउंडेशनच्या अध्यक्षा रितू छाब्रिया आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड होते. एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांच्या संकल्पनेतून महिला संसद भरवली जात आहे.
वसुंधरा राजे सिंधिया म्हणाल्या, महिलांना कधीही कमकुवत समजू नका. कारण कोविडच्या काळात महिला डॉक्टर आणि नर्सेस यांनी या देशात खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. देशातील प्रत्येक महिलेने उच्च शिक्षण घेतले, तर येणारी पिढी ही कधीही अशिक्षित राहणार नाही.
आनंदीबेन पटेल म्हणाल्या, महिलांनी राजकारण, आर्थिक, सामाजिक क्षेत्राबरोबर सर्वंच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे, तरीही त्यांना अन्य क्षेत्रांमध्ये सामवून घेणे ही काळाची गरज आहे.
कार्यक्रमात रेणुका सिंग सरुता, देवाश्री चौधरी, डॉ.मल्लिका साराभाई, रितू छाब्रिया, विश्वनाथ कराड, राहुल कराड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.अदिती कराड यांनी आभार मानले.