पुणे : कोरोना लसीकरणाची शहरात सुरुवात केली जाणार आहे. शहरातील विविध लसीकरण केंद्र व कक्षांवरील तयारीची काँग्रेसच्या नगरसेवक-पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. केवळ घोषणाबाजी करण्यापेक्षा योग्य तयारी करावी आणि लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे, अशी मागणी गटनेते आबा बागुल यांनी केली.
नगरसेवक रवींद्र धंगेकर, नगरसेवक रफिक शेख, नगरसेविका सुजाता शेट्टी, नगरसेविका वैशाली मराठे, स्थायी समितीच्या सदस्य लता राजगुरू यांनी आरोग्य प्रमुख डॉ.भारती, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांच्यासोबत पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात पाहणी केली. या रुग्णालयात प्रशासनाची कोणतीही पूर्वतयारी नसल्याचे दिसून आले, तसेच कल्पना देऊनही रुग्णालयात अस्वच्छता कायम असल्याचे दिसून आल्याचे बागुल यांनी सांगितले. यासोबतच ससून रुग्णालयाचे प्रमुख डॉ.मुरलीधर तांबे, डॉ.अजय तावरे यांच्यासमवेत लसीकरण केंद्र व पूर्वतयारीबाबत ससून रुग्णालयात भेट घेतली. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली.