वेळ द्यायचा नाही; अभिनयही झटपट शिकायचंय, नव्या पिढीबाबत अभिनेते मनोज वाजपेयी यांची खंत

By श्रीकिशन काळे | Published: January 23, 2024 02:38 PM2024-01-23T14:38:08+5:302024-01-23T14:38:42+5:30

अभिनेत्यांना स्वतःविषयी खुप प्रेम असता कामा नये. तुम्हाला दुसरे कोणी काही म्हणण्यापेक्षा, स्वतःच स्वतःचे टीकाकार व्हायला हवे

Don't give time Actor Manoj Vajpayee regrets about the new generation they have to learn acting too | वेळ द्यायचा नाही; अभिनयही झटपट शिकायचंय, नव्या पिढीबाबत अभिनेते मनोज वाजपेयी यांची खंत

वेळ द्यायचा नाही; अभिनयही झटपट शिकायचंय, नव्या पिढीबाबत अभिनेते मनोज वाजपेयी यांची खंत

पुणे : अभिनय शिकण्यासाठी संयमाची गरज आहे. आज संयम नसल्याचे दिसते. तुम्ही अभिनय शिकायला जाता आणि तुम्हाला कोणी ओटीटीवर बोलवतो, कोणी नाटक करायला बोलवतो. असे खूप मोह येतात. त्यामुळे तुमचे लक्ष विचलीत होते. पण अभिनयाचे शिक्षण नीट घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांनी वेळ दिला पाहिजे. आजकाल कोणाला वेळ द्यायचा नाही. सगळ्यांना अभिनयही झटपट ५-६ दिवसांच्या कार्यशाळेमध्ये शिकायचा आहे, अशी खंत अभिनेते मनोज वाजपेयी यांनी विद्यार्थ्यांना दिला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानात ‘द क्राफ्ट ऑफ ॲक्टिंग’ या विषयावर ते बोलत होते.    

महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार् पटेल यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, समर नखाते उपस्थित होते.

वाजपेयी म्हणाले, “अभिनय करणाऱ्या आणि विशेषतः नाटकात काम करणाऱ्यांनी, नाचाचा एक तरी प्रकार शिकला पाहिजे. अभिनय करणाऱ्या प्रत्येकाने कविता मोठ्याने सतत वाचली पाहिजे. लेखकाने खूप मेहनत घेऊन संहिता लिहिलेली असते. ती अशीच घेता येत नाही. तिच्यावर तुम्ही काम केले पाहीजे. एका अभिनेत्याला आपले शरीर, आवाज हे सगळे माहीत पाहीजे. अभिनेत्यांना स्वतःविषयी खुप प्रेम असता कामा नये. तुम्हाला दुसरे कोणी काही म्हणण्यापेक्षा, स्वतःच स्वतःचे टीकाकार व्हायला हवे.” ते म्हणाले, तुमच्याकडे संस्था बनण्याची ताकद असेल, तर तुम्हाला कोणत्याही संस्थेत जाऊन शिकण्याची गरज नाही.
अभिनयाविषयी वाजपेयी म्हणाले, “मै रहू ना रहो, किरदार रहना चाहीये. पूर्वी मी केलेल्या भूमिका माझ्या मनात सतत रहायच्या. ‘शूल’ मधील भूमिका खूप काल माझ्या मनात रेंगाळत होती. त्याचा माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. नंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि स्वतःवर काही प्रयोग केले. योगाचा उपयोग केला. त्याचा सकारात्मक परिणाम ‘पिंजर’मधल्या भूमिकेमध्ये दिसतो. तुम्हाला एखाद्या भूमिकेमध्ये जाता आले पाहीजे.”

नाटक आणि चित्रपट यांमधला फरक सांगताना ते म्हणाले, की अभिनेता हा नाटकात मोठा असतो, पण दिग्दर्शक हा चित्रपटात खूप मोठा असतो. ॲक्टर्स डिरेक्टर खुप कमी आहेत. अभिनेते हे गोंधळलेले असतात. त्यांना दिशा देणे गरजेचे असते, त्यासाठी दिग्दर्शक महत्त्वाचा असतो. त्यांनी आपण अभिनयाकडे कसे आलो, याची कथा सांगितली.

ते म्हणाले, “मी बिहारच्या एका छोट्या गावातून आलो. मला शिकण्यासाठी जिल्हा शाळेमध्ये पाठवण्यात आले. तिथे एका कवितेच्या स्पर्धेसाठी निवडण्यात आले. मी पाचवीला असताना कविता म्हंटली आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. तिथे मला मी सापडलो, माझे स्वातंत्र्य सापडले. बिहारमध्ये नाटक करणाऱ्यांना भांड म्हंटले जायचे. आम्ही नसरुद्दीन शहा, राज बब्बर यांच्या कहाण्या वाचत आलो होतो. पुढे दिल्लीला आलो आणि थिएटर काय आहे, हे समजले. १० वर्षे थिएटर केले. प्रत्येकवेळी नवा अनुभव यायचा. ‘ॲक्ट वन’ नावाचा आमचा ग्रुप होता. आता तो ग्रुप बंद झाला, कारण लोकांना आता झटपट हवे आहे. आम्ही थिएटर करताना पथनाट्य करायचो. प्रोसेनियम थिएटर करायचो. आवाजावर मेहनत घ्यायचो.

मुंबई हे अवघड शहर आहे. ५ वर्षं असेच संघर्ष करीत काढले. मला माझ्याबद्दल जे वाटत होते ते सगळे खोटे आणि आभासी होते. पण पुढे ‘सत्या’च्या भूमिकेने मला करियर दिले. ते म्हणाले, “मला माझी फिल्मोग्राफी तयार करायची होती. म्हणून मग ‘भोसले’, गली गुलिया, अलिगढ यांसारखे चित्रपट केले. स्टारडम येते आणि जाते, पण मी स्क्रिप्टकडे लक्ष देतो. नव्या कल्पना, नवे दिग्दर्शक यांना प्राधान्य देतो.”

अनेकांनी मराठी शिकवले

मराठीचा संबंध सांगताना वाजपेयी म्हणाले, “सत्या’च्या भूमिकेसाठी मराठी शिकण्याची गरज होती. आमच्याकडे येणाऱ्या कोल्हापूरच्या मावशी होत्या, त्यांनी मराठी शिकवले. अलिगढमधील भूमिकेसाठी आमचे एक स्नेही होते त्यांनी मराठी साहित्य आणि मराठी शिकवले. मराठी २५ दिवस शिकलो आणि साहित्यामध्ये समरसून जाणारा प्राध्यापक अनुभवला.

विजय तेंडुलकर यांच्याविषयी बोलताना वाजपेयी म्हणाले, की लहानपणापासून त्यांची नाटके वाचत-बघत होतो. ‘घाशीराम कोतवाल’ आणि ‘सखाराम बाईंडर’, ही आवडती नाटके आहेत. तेंडुलकर हे आजही नव्या पिढीने वाचले पाहिजेत कारण ते काळाशी सुसंगत आहेत.

Web Title: Don't give time Actor Manoj Vajpayee regrets about the new generation they have to learn acting too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.