आधी रक्तदान मग शुभमंगल सावधान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:10 IST2021-04-11T04:10:36+5:302021-04-11T04:10:36+5:30
पुणे : संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. या परिस्थितीत राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला ...

आधी रक्तदान मग शुभमंगल सावधान’
पुणे : संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. या परिस्थितीत राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. वेळोवेळी होणारी रक्तदान शिबिरे होऊ शकलेली नाहीत. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. जोडप्यांनी आयुष्याची नवी सुरूवात करताना रक्तदानाद्वारे एखाद्याला जीवनदान द्या... आपले नातेवाईक आणि मित्रमंडळींना सोबत घेऊन रक्तदान करा, ‘आधी रक्तदान मग शुभमंगल सावधान’ अशी अभिनव संकल्पना ‘राईट टू लव्ह’चे अभिजित कांबळे यांनी मांडली आहे. या संकल्पनेला तरुणाईकडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.
कोरोना काळातही लग्नकार्य थांबलेले नाही. तरुण जोडपी लग्नाच्या बंधनात अडकत आहेत. पण आपल्या आनंदाच्या क्षणी इतरांच्या आयुष्यात देखील ही मंडळी आनंद निर्माण करू शकतात. हेच या उपक्रमाच्या माध्यमातून सांगण्याचा छोटासा प्रयत्न आहे. आजच्या कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. लोकांचे जीव जात आहेत. दिवसागणिक मृत्यूचे आकडे ऐकून हतबलता येऊ लागली आहे. काही रुग्णांना सातत्याने रक्त द्यावे लागते. हे पाहिल्यानंतर तरुणाईने काहीतरी करून वेगवेगळ्या उपक्रमातून रक्तदान करायला पुढे यायला हवं. एक रक्तदाता तीन लोकांचे जीव वाचवू शकते. हीच वेळ आहे माणुसकी दाखवायची आणि माणूस म्हणून जगायची. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी जोडप्यांनी सर्व नातेवाईक, मित्रमंडळींनाबरोबर घेऊन रक्तदान करावे आणि आयुष्याची सुरुवात प्रेरणादायी करावी, असे आवाहन ’’आधी रक्तदान मग शुभमंगल सावधान’ या उपक्रमाच्या माध्यमातून सोशल मीडियावर केले असल्याची माहिती अभिजित कांबळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
------------------------------------------
सोशल मीडियावर ही संकल्पना मांडल्यानंतर लातूरमधल्या एका मित्राने आपणहून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. तो म्हणाला, पुढच्या रविवारी माझे लग्न आहे. आमच्या नातेवाईकांना मी पहिल्यांदा रक्तदानासाठी घेऊन जाईन आणि मगच बोहल्यावर चढेन. जोडप्यांच्या अशा प्रतिसादामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
- अभिजित कांबळे, राईट टू लव्ह
-------------------