पीएम केअर फंटातील व्हेंटिलेटर्स वापरताना डाॅक्टरांना वाटतेय धाकधूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST2021-05-15T04:10:25+5:302021-05-15T04:10:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यासाठी पीएम केअर फंडातून ३५४ व्हेंटिलेटर्स देण्यात आले असून, इन्स्टॉलेशन झालेले सर्व व्हेंटिलेटर्स ...

पीएम केअर फंटातील व्हेंटिलेटर्स वापरताना डाॅक्टरांना वाटतेय धाकधूक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यासाठी पीएम केअर फंडातून ३५४ व्हेंटिलेटर्स देण्यात आले असून, इन्स्टॉलेशन झालेले सर्व व्हेंटिलेटर्स सुरू आहेत. तर पन्नास टक्के व्हेंटिलेटर्स इन्स्टॉलेशनचे काम सुरू आहे. काही व्हेंटिलेटर्समध्ये तांत्रिक अडचणी होत्या. पुण्यातील तज्ज्ञ अभियंत्यांनी दुरुस्त केले. परंतु सुरू असलेले व्हेंटिलेटर्समध्येच बंद पडत असल्याने डाॅक्टरांना धाकधूक वाटत असल्याचे काही डाॅक्टरांनी ऑफ दी रेकॉर्ड ‘लोकमत’ला सांगितले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर रुग्णांना मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर्स बेड्सची गरज निर्माण झाली. यामुळेच केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करून पीएम केअर फंडातून देशभरातील रुग्णालयांना व्हेंटिलेटर्स पुरविले. यात पुणे जिल्ह्यासाठी ३५६ व्हेंटिलेटर्स देण्यात आले. यापैकी सध्या पन्नास टक्के व्हेंटिलेटर्स शहर आणि जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात बसविण्यात आले असून सुरू आहेत. तर पन्नास टक्के व्हेंटिलेटर्स बसविण्याचे काम सुरू आहे. यात काही तांत्रिक अडचणी असल्याने तज्ज्ञांच्या मार्फत दुरुस्ती करण्याचे काम सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर्स मधेच बंद पडण्याची किंवा ऑक्सिजन लेव्हल कमी जास्त होतो. यामुळेच ससून व अन्य काही रुग्णालयांनी हे व्हेंटिलेटर्स वापरताना अधिक खबरदारी घेत सीएसआर व अन्य व्हेंटिलेटर्स वापरण्याला प्राधान्य दिले आहे.
-----
पीएम केअर फंडातून जिल्ह्याला ३५४ व्हेंटिलेटर्स मिळाले
क्षेत्र मिळाले सुरू बंद
पुणे महापालिका ६८ ३० ३८
पिंपरी-चिंचवड १०७ ५३ ५४
पुणे ग्रामीण ९८ ७३ २५
ससून ८१ ४० ४१( पुणे मनपाला दिले)
--------
पुणे ग्रामीण भागासाठी पीएम केअर फंडातून ९८ व्हेंटिलेटर्स देण्यात आली. यातील ७३ व्हेंटिलेटर्स सुरू असून, २५ व्हेंटिलेटर्स इन्स्टॉलेशनचे काम सुरू आहे. हे व्हेंटिलेटर्स इन्स्टॉल झाल्यानंतर सुरू करून पाहिले जाईल. व्हेंटिलेटर्स ड्राय-रन केल्यानंतर प्रत्यक्ष वापरण्यात येईल.
- डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक