हेल्मेट न घालणे बेतले महिला डॉक्टरच्या जीवावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 14:53 IST2017-07-26T14:50:42+5:302017-07-26T14:53:39+5:30
पुण्यातील हडपसरमध्ये एका टेम्पोने महिला डॉक्टरला चिरडल्यानं तिचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. हडपसरमधील मगरपट्टा रोडवर कल्याण ज्वेलर्सजवळ ही घटना घडली

हेल्मेट न घालणे बेतले महिला डॉक्टरच्या जीवावर
पुणे, दि. 26- पुण्यातील हडपसरमध्ये एका टेम्पोने महिला डॉक्टरला चिरडल्यानं तिचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. हडपसरमधील मगरपट्टा रोडवर कल्याण ज्वेलर्सजवळ ही घटना घडली. बुधवारी ( 26 जुलै ) सकाळी हा अपघात घडला आहे.
अनुराधा पटनवार असं मृत डॉक्टरचं नाव असून त्या अवघ्या 23 वर्षांच्या होत्या. साने गुरुजी रुग्णालयात त्या कर्तव्य बजावत होत्या. मूळच्या नांदेडच्या असलेल्या अनुराधा सध्या भेकराईनगरमध्ये राहत होत्या.
अनुराधा स्कूटीवरुन जात असताना एका टेम्पोची त्यांना जोरदार धडक बसली. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात अनुराधा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या मृत्युमूखी पडली. दरम्यान, अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेल्मेट असतानाही अनुराधा यांनी ते न वापरणे, ही बाब त्यांच्या जीवावर बेतल्याचे बोलले जात आहे. अपघातानंतर त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.