लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्याचा ठराव आहे. चुकीच्या नवीन पार्किंग धोरणाची अंमलबजावणी न करता मूळ ठरावाप्रमाणे करावी. शहरातील प्रमुख पाच रस्ते निश्चित करून प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करून, त्याचा अहवाल महापौरांसह पदाधिकाऱ्यांना द्यावा, अशी मागणी पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली आहे.
याखेरीज शहरातील इतर कोणत्याही ठिकाणी नवीन पार्किंग दरांची अंमलबजावणी करू नये अशीही मागणी त्यांनी केली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत होणे व रस्त्यांवर वाहतूककोंडी टाळण्यासाठी पार्किंग धोरण ठरावास मान्यता देण्यात आलेली आहे.
नागरिकांनी वाहने रस्त्यांवर न लावता, जास्तीत जास्त प्रमाणात बंदिस्त पार्किंगमध्ये लावावीत. पालिकेच्या वाहनतळांना प्रतिसाद मिळण्याकरिता रस्त्याावरच्या पार्किंग शुल्काचे दर जास्त ठेवण्यात आलेले आहेत. वाहनतळांचे दर कमी ठेवले आहेत. शहरातील प्रमुख पाच रस्ते निश्चित करुन तेथे प्रायोगिक तत्त्वावर या योजनेची अंमलबजावणी करण्याचे ठरले होते. परंतु, अद्यापही हे पाच रस्ते निश्चित करण्यात आलेले नसून ही योजना प्रायोगित तत्त्वावरही सुरू झालेली नाही.
प्रायोगिक तत्त्वावरील अंमलबजावणी न करताच, शहरातील सर्व बंदिस्त वाहनतळांमध्ये नवीन पार्किंग धोरणाचे दर लागू करण्याचा घाट घातला जात आहे. नवीन पार्किंग धोरणाचे दर, हे मूळ दराच्या तिप्पट असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नोकरदार, सामान्य व्यापारी, व्यावसायिक, विद्यार्थी, कामगार महिलावर्ग, छोटे-मोठे दुकानदार यांच्यावर नाहक बोजा पडणार आहे. नागरिकांवर हा अधिकचा भुर्दंड लादणे अन्यायकारक असल्याचे निवेदन धुमाळ यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.