अंध क्रिकेटपटूंवर अन्याय नको; लोकाश्रय मिळण्याची गरज
By Admin | Updated: December 16, 2014 04:28 IST2014-12-16T04:28:28+5:302014-12-16T04:28:28+5:30
कोणतेही यश मिळवायचे असेल, तर त्यासाठी जिद्द हवी. जिद्द असल्यावर निसर्गाने आणलेले अडथळे देखील दूर होतात.

अंध क्रिकेटपटूंवर अन्याय नको; लोकाश्रय मिळण्याची गरज
महेंद्र कांबळे , बारामती
कोणतेही यश मिळवायचे असेल, तर त्यासाठी जिद्द हवी. जिद्द असल्यावर निसर्गाने आणलेले अडथळे देखील दूर होतात. याचीच प्रचिती बारामती तालुक्यातील अमोल दत्तात्रय करचे (रा. सदोबाचीवाडी) या २० वर्षीय अंध तरुणाने दक्षिण अफ्रिकेत नुकत्याच झालेल्या अंधाच्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रातून भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची निवड झाली होती. भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाला नमवून वर्ल्डकप जिंकला आहे. अंधाच्या क्रिकेट संघाला लोकाश्रय मिळावा, अशी अपेक्षा त्याची आहे.
अत्यंत हालाखीच्या कुटुंबातील जन्मत: अंधत्व असलेल्या अमोल याने पुण्यातील अंध शाळेत शिक्षण घेतले. तेथेच क्रिकेटचे धडे गिरवले. सुरुवातीला जिल्हास्तरीय संघात, त्यानंतर विभाग स्तरावर त्याची निवड झाली. उत्तरोत्तर त्याचा खेळ बहरत गेला. विभागस्तरावरून थेट राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट संघात त्याची निवड झाली. एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या टी - २० अंधांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताच्या संघात त्याची निवड झाली. या स्पर्धेचे अजिंक्य पद देखील भारतीय संघाने पटकावले. त्यात अमोलची कामगिरी अष्टपैलू होती. त्यानंतर अंधांच्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली. दक्षिण अफ्रिकेत चौथ्या ‘ब्लार्इंड वर्ल्डकप’ क्रिकेट स्पर्धेत देखील त्याने अष्टपैलू कामगिरी केली. सलग दोन वेळा विजेतेपद पटकावलेल्या पाकिस्तानच्या संघाला भारताच्या अंध संघाने नमवले. विजेते पद पटकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजेत्या संघाचे कौतूक केले. प्रत्येकी ५ लाख रुपये बक्षीस दिले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी देखील त्याचे कौतूक केले.
जागतिक स्तरावर खेळत असलेल्या अमोलच्या कामगिरीची माहिती गावात देखील नव्हती. वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्याच्या मित्रमंडळींनी अभिनंदनाचे फ्लेक्स बोर्ड लावल्यानंतर गावकऱ्यांना समजले.
भारताने वर्ल्डकप जिंकला होता तेव्हा भारतीय क्रिकेटपटूंवर विविध संस्था, संघटना, उद्योगपतींनी व खेळाडूंच्या त्या त्या राज्यांनी बक्षिसांचा वर्षाव केला होता. अनेक खेळाडूंना महागडी घरे, मोटारी भेट देण्यात आल्या होत्या.मात्र अंध खेळाडूंना यातील काहीही मिळालेले नाही, हा फरक का? असा प्रश्न विचारला जात आहे.