महापुरुषांना जातीमध्ये बांधू नका : धनंजय मुंडे
By Admin | Updated: August 9, 2015 03:48 IST2015-08-09T03:48:15+5:302015-08-09T03:48:15+5:30
गेल्या काही वर्षांत महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमात अनेक बदल झाले आहेत. विशिष्ट समाजाचे लोकच त्यांचे कार्यक्रम साजरे करीत आहेत. महापुरुषांचे कार्य हे देशाला

महापुरुषांना जातीमध्ये बांधू नका : धनंजय मुंडे
पुणे : गेल्या काही वर्षांत महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमात अनेक बदल झाले आहेत. विशिष्ट समाजाचे लोकच त्यांचे कार्यक्रम साजरे करीत आहेत. महापुरुषांचे कार्य हे देशाला प्रेरणा देणारे होते. त्यामुळे त्यांना जातीत बांधू नका, असे परखड मत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शनिवारी व्यक्त केले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर पालिकेच्या वतीने आयोजिलेल्या अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक महोत्सवाचे मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. उपमहापौर आबा बागुल, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, सभागृहनेते बंडू केमसे, माजी सभागृहनेते सुभाष जगताप, नगरसेवक बाबूराव चांदेरे, सचिन भगत, महेंद्र पठारे, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री तेजश्री प्रधान आदी या वेळी उपस्थित होते. विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांचा या वेळी मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुंडे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केवळ मराठा समाजासाठी केली नव्हती, घटनेचा फायदा केवळ दलित समाजाला झाला नाही. तसेच साठे यांचे साहित्य हे फक्त मातंगांसाठी नव्हते, महात्मा फुले यांनी सुरू केलेली शिक्षणाची चळवळ सर्वव्यापी होती. त्यामुळे या महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी कोणत्याही जातीसाठी मर्यादित ठेवू नका. महोत्सवाच्या उद्घाटनानंतर नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
महापालिकेच्या वतीने आयोजित साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक महोत्सवात अण्णा भाऊ साठे यांच्या कार्यावर आधारित एकही कार्यक्रम नसल्यामुळे हा महोत्सव रद्द करण्याची मागणी करीत मागासवर्गीय परिवर्तन संघाने ‘बालगंधर्व’च्या बाहेर जोरदार निदर्शने केली. ‘पुढील वर्षी असे कार्यक्रम घेतले जाणार नाहीत, कार्यक्रमात बदल केले जातील, असे आश्वासन मुंडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.