भोर शहराला बकालपणा
By Admin | Updated: August 4, 2014 04:17 IST2014-08-04T04:17:44+5:302014-08-04T04:17:44+5:30
भोर शहरातील नव्यानेच केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे सर्वच रोडला खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे

भोर शहराला बकालपणा
भोर : तुंबलेली गटारे, जागोजागी पडलेला कचरा, वाढलेली झाडेझुडपे, खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली चाळणी, अस्ताव्यस्त कचराकुंड्या, सर्वत्र दुर्गंधी, गढूळ व अपुरा पाणीपुरवठा, पद असलेले पथदिवे, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था, रोजच होणारी वाहतूककोंडी, यामुळे भोर शहराला बकालपणा आला असून, या बाबत मात्र नगरपरिषद उदासीन आहे. या बाबत तक्रारी करूनही नारिकांच्या पदरी निराशाच पडते.
भोर शहरातील नव्यानेच केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे सर्वच रोडला खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे रस्त्यावरून जाणेही नागरिकांना अवघड झाले आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, हे कळत नाही. यामुळे येथे अपघात होत आहेत.
भर पावसाळ्यात पाणीपुरवठा नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतोय. शहरातील अनेक ठिकाणचे पथदिवे बंद आहेत. रात्री-अपरात्री लोकांना वावरताना त्रास होतो. चोऱ्या वाढल्या आहेत, शहरातील सार्वजनिक मुताऱ्या व शौचालये यांची साफसफाई वेळेवर होत नाही तसेच तेथे पाणीपुरवठा वेळेवर होत नाही. त्याची दुरवस्था झाली आहे. शहरातील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, भोर नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे याकडे पूर्ण नाही दुर्लक्ष होत आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा वाद शेवटपर्यंत सुरूच आहे. त्यांच्या वादामुळे नागरिकांना मात्र समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. विरोधी नगरसेवक मूगगिळून गप्प आहेत, त्यामुळे भोर नगरपालिकेची अवस्था एखाद्या ग्रामपंचायतीपेक्षा वाईट झाली आहे. शहरातील वाढती अतिक्रमणांमुळे वाहतुकीच्या समस्यांचा बोजवारा उडाला आहे. नवीन तयार केलेली बाग एक दिवस सुरू झाली व वादामुळे पुन्हा बंद झाली, ती आता शोभेची वस्तू झाली आहे. भोर समस्यांचे शहर बनले आहे.