मोटार खरेदीचे बॉम्ब फोडले, कारची तिप्पट विक्री, एकूण वाहन विक्रीत झाली ३१ टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 01:16 IST2018-11-10T01:15:13+5:302018-11-10T01:16:29+5:30
सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर घातलेल्या निर्बंधामुळे यंदाच्या दिवाळीत फटाक्याचा बार तितकासा उडाला नाही. मात्र, पुणेकरांनी वाहन खरेदीची लडी फोडत आपली दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली आहे.

मोटार खरेदीचे बॉम्ब फोडले, कारची तिप्पट विक्री, एकूण वाहन विक्रीत झाली ३१ टक्क्यांनी वाढ
पुणे - सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर घातलेल्या निर्बंधामुळे यंदाच्या दिवाळीत फटाक्याचा बार तितकासा उडाला नाही. मात्र, पुणेकरांनी वाहन खरेदीची लडी फोडत आपली दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली आहे. त्यातही कार खरेदीचा ‘बॉम्ब’ फोडत गेल्या पेक्षा तिप्पट खरेदी केली आहे. दुचाकी आणि प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांचे देखील भुईनळे उडवत वाहन खरेदीची आतषबाजी केली आहे.
वाहन विक्रीसाठी यंदाच्या दसऱ्याला तितकीशी सोनेरी झळाली लाभली नव्हती. दसºयाच्या काळात अवघ्या ५ हजार ६२६ वाहनांची विक्री झाली होती. गेल्या वर्षीपेक्षा दुचाकींची विक्री २९ टक्क्यांनी घटून, ती ४ हजार ११५ पर्यंत खाली घसरली. चारचाकी गाडींच्या विक्रीत तब्बल ५४ टक्क्यांनी घट होऊन, ती ९७० पर्यंत खाली आली. दसरा निराशाजनक गेल्याने वाहन कंपन्यांबरोबरच वाहन विक्रेत्यांना देखील दिवाळीच्या खरेदीवर वार्षिक विक्रीचे उद्दीष्ट गाठण्याचे मोठे दडपण होते. मात्र, दिवाळीमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक वाहन खरेदी करण्यात आली असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) आकडेवारीवरुन स्पष्ट होत आाहे.
यंदाच्या दिवाळीला १४ हजार १८५ वाहनांची विक्री झाल्याची नोंद आरटीओकडे झाली आहे. त्यातून २५ कोटी २० लाखांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला. गेल्या वर्षीपेक्षा ८ कोटी १५ लाखांचा अधिक महसूली उत्पन्न मिळाले आहे. तसेच ३ हजार ३८५ वाहनांची अधिक विक्री झाली. दसºयात वाहन विक्रीत झालेली घट दिवाळीने भरुन काढली आहे. दुचाकी, चारचाकी, प्रवासी आणि माल वाहतूक वाहनांच्या खरेदीतही वाढ झाली आहे.
दसरा आणि दिवाळी या काळातच १९ हजार ८११ वाहनांची भर पडली आहे. त्यात दोन्ही सणांच्या काळात मिळून १३ हजार ५९३ दुचाकींची विक्री झाल्याने शहरातील दुचाकींची संख्या २८ लाखांवर गेली आहे. त्यामुळे मार्च २०१९ पुर्वीच शहरातील वाहन संख्या ३८ लाखांचा टप्पा पार करेल.
४सप्टेंबर २०१८ अखेरीस शहरातील वाहनांची
संख्या ३७ लाख ६० हजार ७२५ इतकी होती. यामध्ये दुचाकींची संख्या २७ लाख ९१ हजार ८०८ आणि चारचाकी वाहनांची संख्या ६ लाख ६८ हजार ९१५ इतकी आहे. प्रवाशी आणि मालवाहतूक करणारी वाहने ३ लाख होती.