जिल्ह्याला केंद्राचा दिलासा, ३ लाख २५ हजार लसींचा मिळाला पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:01+5:302021-04-01T04:12:01+5:30
केंद्राकडून पुणे जिल्ह्यासाठी तब्बल ३ लाख २५ हजार ७८० कोविशिल्ड लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच आगामी २ ते ...

जिल्ह्याला केंद्राचा दिलासा, ३ लाख २५ हजार लसींचा मिळाला पुरवठा
केंद्राकडून पुणे जिल्ह्यासाठी तब्बल ३ लाख २५ हजार ७८० कोविशिल्ड लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच आगामी २ ते ३ दिवसांत आणखी १ लाख लस दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
१ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील सगळ्यांना सरसकट लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्याला इतक्या मोठ्या प्रमाणात कोविशिल्ड लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. दरम्यान, सद्यस्थितीला बारा ते तेरा हजार इतके लसीकरण होत आहे. हा आकडा जवळपास १८ हजारांपर्यंत पोहोचला होता. मात्र, लसींचे पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने ही संख्या पुन्हा घटली असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
गेल्या आठवड्यात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी याबाबत संपर्क करुनही लसींचे डोस योग्य प्रमाणात उपलब्ध व्हावे म्हणून संपर्क केला होता.
केंद्राकडून बुधवारी पुण्याला ३ लाख २५ हजार ७८०, सातारा ५९ हजार ४५०, सोलापूर ३ हजार १००, सांगली २८ हजार ७५०, कोल्हापूर ९६ हजार ७८० अशा प्रमाणात कोविशिल्ड लसींचे डोस उपलब्ध झाले आहे. त्यात पुणे, ग्रामीणला प्रत्येकी १ लाख ४० हजार, तर पिंपरीला ४५ हजार ७८० डोस मिळणार आहे.
आजमितीला महापालिका आणि खासगी रुग्णालये अशी एकूण १०९ आणि ८ शासकीय अशी एकूण ११७ लसीकरण केंद्रे आहे. आता नव्याने आणखी २२३ लसीकरण केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव पालिकेकडून केंद्राला पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास शहरातील लसीकरण केंद्राची संख्या तब्बल ३४० इतकी होईल. येत्या १ एप्रिलपासूनच ही सर्व केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आहे. त्या माध्यमातून दिवसाला जवळपास ७० हजार नागरिकांना लसीकरण करता येऊ शकेल एवढी सोय उपलब्ध होणार आहे.