जिल्ह्यातील ८० हजार ट्रक भंगारात

By Admin | Updated: December 6, 2015 03:16 IST2015-12-06T03:16:18+5:302015-12-06T03:16:18+5:30

केंद्र शासनाने वाढते प्रदूषण रोखण्यासाठी १५ वर्षे जुने ट्रक भंगारात काढण्याचा निर्णय घेतल्याने पुणे जिल्ह्यातील तब्बल ८० हजार ट्रक भंगारात निघणार आहेत. पुढील वर्षी १ एप्रिल

Distribution of 80 thousand trucks in the district | जिल्ह्यातील ८० हजार ट्रक भंगारात

जिल्ह्यातील ८० हजार ट्रक भंगारात

पुणे : केंद्र शासनाने वाढते प्रदूषण रोखण्यासाठी १५ वर्षे जुने ट्रक भंगारात काढण्याचा निर्णय घेतल्याने पुणे जिल्ह्यातील तब्बल ८० हजार ट्रक भंगारात निघणार आहेत. पुढील वर्षी १ एप्रिल पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशनने या निर्णयाचा निषेध केला असून, हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली. याबाबत निर्णय झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा संघटनेचे व्यवस्थापकीय सदस्य बाबा शिंदे यांनी दिला आहे.
देशातील शहरांमधील हवेची स्थिती गंभीर बनल्याने त्यात प्रामुख्याने जुन्या वाहनांचा समावेश असल्याने १५ वर्षांहून अधिक जुनी व्यापारी वाहने येत्या १ एप्रिलला बंद करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्याची अधिकृत सूचना येत्या १० दिवसांत काढली जाणार आहे. मात्र, या निर्णयाचा फटका पुणे जिल्ह्यातील वाहतूक व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. देशभरात २७ लाख ट्रक १५ वर्षांहून जुने आहेत. त्यापैकी जवळपास ८० ते ९० हजार ट्रक एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे मालवाहतूकदारांमध्ये नाराजी आहे. प्रत्यक्षात या वाहनांचे आयुर्मान ठरविण्यासाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि आणि केंद ्रशासनामध्ये गेल्या पाच वर्षांपासून चर्चा सुरू आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नसतानाच केंद्राकडून हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने मालवाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने वाळू, साखर, गूळ, तसेच भाजीपाला, ऊस आणि डबर वाहतुकीसाठी जुनी वाहने मोठ्या प्रमाणात वापरली जातात. ती लोकल वाहतुकीसाठी म्हणजेच २० ते ४० किलोमीटरच्या वाहतुकीसाठी वापरली जातात. केंद्र शासनाचा निर्णय मोठ्या शहरांच्या प्रदूषणाची निगडित आहे. तर ही मालवाहतूक प्रामुख्याने आंतरजिल्हा होते शहरात नाही. त्यामुळे ही वाहने भंगारात निघाल्यास हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. (प्रतिनिधी)

परिवहनमंत्र्यांना देणार निवेदन
या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी येत्या सोमवारी (दि.७) रोजी संघटनेच्या वतीने केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे बाबा शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Distribution of 80 thousand trucks in the district