संकटांना निर्भयपणे सामोरे जावे
By Admin | Updated: July 3, 2017 03:36 IST2017-07-03T03:36:27+5:302017-07-03T03:36:27+5:30
संकटे सगळ्यांच्या आयुष्यात येतात, त्यांना समजून घेऊन त्यांचा अभ्यास केला पाहिजे. संकटांच्या वाटेवर चालायला सुरुवात केली तर

संकटांना निर्भयपणे सामोरे जावे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संकटे सगळ्यांच्या आयुष्यात येतात, त्यांना समजून घेऊन त्यांचा अभ्यास केला पाहिजे. संकटांच्या वाटेवर चालायला सुरुवात केली तर आपल्याला हिंमत मिळेल. मन हा स्फूर्तीचा उधळलेला घोडा आहे. त्याला काबूत ठेवले तर तो तुमचे वाहन बनेल. त्यामुळे आपले मन हे बुद्धीने नियंत्रित करून संकटांना निर्भयपणे सामोरे गेले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी केले.
परमहंस स्वच्छंदानंद सेवा प्रतिष्ठानतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन कोथरूड येथील मृत्युंजय मंदिर येथे करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. अनिल अवचट यांच्या ‘संकटे आणि सामना’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विश्वस्त हरिभाऊ वाघ, नृत्यांगना मनीषा साठे यांच्यासह डॉ. शैलजा मांडके आणि स्वच्छंदानंद गायत्री परिवाराचे सर्व सभासद उपस्थित होते. दि. १ ते ७ जुलैपर्यंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
अवचट म्हणाले, ‘संकटांचा द्वेष करु नका, त्यांना आपला मित्र बनवा. संकट नावाचा मित्रदेखील आपल्याला खूप काही शिकवून जातो. माणूस जेव्हा संकटातून बाहेर पडतो, तेव्हा तो अधिक चांगला माणूस बनतो. कारण, त्याने जीवन एका वेगळ्या चौकटीतून पाहिलेले असते. अशावेळीच माणसांची खरी किंमत कळते. संकटांमुळे विविध अनुभव आपल्या पाठीशी असतात. या अनुभवांमुळे शहाणपण आलेले असते.’
पुणेकरांनी मोठ्या संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. डॉ. शैलजा मांडके यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा साठे यांनी आभार मानले.
३ जुलै रोजी निवेदक सुधीर गाडगीळ यांचे ‘मुलखावेगळी माणसं या विषयावर व्याख्यान होईल. ४ जुलै रोजी कविता खरवंडीकर व धनंजय खरवंडीकर यांच्या भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे.
५ जुलै रोजी गुरुतत्त्वाचे विवेचन होणार आहे. ६ जुलै रोजी ज्येष्ठ नृत्यांगना मनीषा साठे यांच्या शिष्या व एसआयएसके शिष्य परिवार नृत्य सादरीकरण करणार आहेत. महोत्सवाचा समारोप ७ जुलै रोजी प्रा. शैलजा मांडके यांचे ‘मनातले स्वच्छंद’ या विषयावरील प्रवचनाने होणार आहे.