डीपीवरून पालिकेत असंतोष

By Admin | Updated: March 24, 2015 00:24 IST2015-03-24T00:24:00+5:302015-03-24T00:24:00+5:30

जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावर (डीपी) महापालिकेच्या मुख्य सभेत नियोजन समितीने केलेल्या शिफारशींवर सत्ताधारी सदस्यांकडून जोरदार टीका करण्यात आली.

Dissatisfaction with the DP | डीपीवरून पालिकेत असंतोष

डीपीवरून पालिकेत असंतोष

पुणे : जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावर (डीपी) महापालिकेच्या मुख्य सभेत नियोजन समितीने केलेल्या शिफारशींवर सत्ताधारी सदस्यांकडून जोरदार टीका करण्यात आली. बिल्डरधार्जिण्या अहवालामध्ये सर्वसामान्यांच्या घरांवर मात्र वरवंटा फिरविण्यात आल्याचे स्पष्ट करून निवासी झोनवर टाकण्यात आलेले आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्यात आली. डीपीमध्ये बदल झाला तर ठीक अन्यथा आमचा मार्ग मोकळा असल्याचाही इशारा सोमवारी मुख्य सभेत देण्यात आला.
मुख्य सभेत डीपीवरच्या चर्चेची सुरुवात काही मोजक्या सदस्यांच्या भाषणाने झाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘वानवडीतील निवासी जागेवर पीएसपी (सार्वजनिक इमारतींचे) आरक्षण टाकण्यात आले आहे. त्याचा १२०० ते १५०० कुटुंबीयांना फटका बसणार आहे. मंजूर इमारतीच्या जागेवरून २४ मीटरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. याविरुद्ध वानवडीमधील एक हजार नागरिकांनी हरकती दाखल केल्या. मात्र कोणतेही कारण न देता या हरकती फेटाळून नियोजन समितीने आरक्षण कायम ठेवले आहे. त्यामध्ये डीपीमध्ये आम्ही कुठेच नाही. आमची कोणतीही चौकशी करा, आमच्या घरांवर वरवंटा फिरताना तुम्ही काहीच कसे बोलला नाहीत, याचे उत्तर उद्या मला मतदारांना द्यावे लागणार आहे. नातेवाइकांच्या घरांवरही आरक्षण टाकण्यात आले आहे.’’ नियोजन समितीच्या सदस्यांचा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कारच केला पाहिजे, अशी उपहासात्मक शेरेबाजी करीत नियोजन समितीने केलेल्या पापाचा वाटेकरी मी कदापि होणार नाही, असे जगताप यांनी ठामपणे सांगितले. वानवडीकरांच्या वेदना मांडण्यासाठी आपल्याला इतकं कठोर बोलावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नियोजन समितीच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढणारे प्रशांत जगताप यांचे भाषण ऐकताना सभागृह अवाक झाले. भाषणानंतर त्यांचे विरोधी पक्षांतील सदस्यांनी अभिनंदन केले.

शांतता... नगरसेवकांचा अभ्यास ‘चालू’ आहे
नियोजन समितीने डीपीच्या शिफारशींचा अहवाल २० फेब्रुवारी रोजी मुख्य सभेपुढे ठेवला. त्यानंतर लगेच सर्व नगरसेवकांना त्याच्या प्रती, सीडी पाठवून देण्यात आल्या. नगरसेवकांच्या मागणीनुसार प्रशासनाकडून त्यांचे मराठीमध्ये सादरीकरणही करण्यात आले. त्यानंतर नगरसेवकांनी डीपीवर बोलावे याकरिता सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही नगरसेवकांचा अपवाद वगळता डीपीवर बोलण्यासाठी नगरसेवकांनी नावच दिले नाही. नगरसेवक डीपीवर आज का बोलले नाहीत, याचे उत्तर मात्र गुलदस्त्यातच आहे.

Web Title: Dissatisfaction with the DP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.