पुणे: प्रवासी, माता भगिनींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. स्वारगेट आगार, बसस्थानक व पुणे विभागातील इतर आगार व बसस्थानके येथे काेणताही अनुचित प्रकार यापुढे घडता कामा नये. काय उपाययोजना करायच्या त्या करा. यापुढे स्वारगेट घटनेची पुनरावृत्ती घटना पुन्हा घडल्यास आम्ही स्वस्थ बसणार नाही. स्वारगेट घटनेतील दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने केली आहे. प्रत्येक आगारात खासगी प्रवासी वाहतूक करणारे एजंट, दारुडे, चोर यांचा सुळसुळाट झालेला आहे. या सर्वांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणीही केली.
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल पवार, सरचिटणीस किशोर चिंतामणी यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पुणे विभागीय नियंत्रक प्रमोद नेहूल यांना भेटून निवेदन दिले. तसेच कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. चार दिवसांपूर्वी स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये पहाटे तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. या घटनेने राज्य शासनाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली. याला जबाबदार कोण?, याच्या मुळाशी जाणार कोण? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अनिल पवार यांनी उपस्थित केला आहे