उद्योगनगरीतील विनापरवाना वखारींकडे वनविभागाची डोळेझाक
By Admin | Updated: January 28, 2015 02:31 IST2015-01-28T02:31:12+5:302015-01-28T02:31:12+5:30
वनविभागाचे नियंत्रण सैल झाल्याने मावळ तालुक्यात सध्या बेसुमार वृक्षतोड सुरू असून, येथून उद्योगनगरीत लाकडांचा बेकायदा व्यापार सुरू आ

उद्योगनगरीतील विनापरवाना वखारींकडे वनविभागाची डोळेझाक
अंकुश जगताप, पिंपरी
वनविभागाचे नियंत्रण सैल झाल्याने मावळ तालुक्यात सध्या बेसुमार वृक्षतोड सुरू असून, येथून उद्योगनगरीत लाकडांचा बेकायदा व्यापार सुरू आहे. परिणामी शहरात सद्ध्या विनापरवाना लाकूड वखारींना ऊत आला आहे. मावळात एकाही लाकूड व्यापाऱ्याची नोंद नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे तर शहरात अनेक वखारी विनापरवाना सुरू आहेत. यातून लगतच्या भागातील पर्यावरणाची मोठी हानी होत असून, लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे. वृक्षतोडीवर नियंत्रण आणण्यासाठी वनविभागातर्फे कारवाईची गरज व्यक्त होत आहे.
पिंपरी - चिंचवड शहरामध्ये लाकडाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गृहबांधणीसाठी लाकडाची गरज असतेच. सध्या शहरात स्थलांतरितांचे प्रमाण वाढत आहे. यापैकी कित्येक कुटबांकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना रॉकेल मिळणे कठीण आहे. त्यातच खुल्या बाजारातून स्वयंपाकाचा गॅस बाराशे ते दीड हजार रुपयांना घ्यावा लागत आहे. परिणामी अशा गरजवंतांकडून जळणासाठी लाकडाची मागणी चौपट वाढली आहे. शहर परिसरात सध्या गल्लोगल्ली बेकरी सुरू झाल्या असून, त्यांची संख्या ५ वर्षांतच ३० वरुन १५० च्यावर पोहोचली आहे. बेकरी उत्पादन तयार करण्यासाठी लाकूड पेटवून तयार होणाऱ्या मंद आचेचा उपयोग होतो. या बेकरींसाठी दररोज अंदाजे १५ टन लाकूड जाळले जात आहे. महिन्याकाठी ४५०, तर वर्षभरात हेच प्रमाण अडीच हजार टनपर्यंत पोहोचते. वर्षभरात शहरात एकूण ग्राहकांकडून अंदाजे १० हजार टन लाकडाची मागणी असते.
वाढलेल्या मागणीमुळेच शहरांमध्ये वखारी व लाकूड डेपोंचा धंदा तेजीत आहे. आठ वर्षांपूर्वी अगदी लहान असणाऱ्या व दिवसाला २०० किलो लाकडाची विक्री होणाऱ्या एकेका वखारीमध्ये
आता टनांपर्यंत लाकूड विकले जात आहे. परिणामी या धंद्यातून वखारमलाक चांगलेच गबर झाले आहेत. थेरगाव, चिंचवड,
आकुर्डी, पिंपरी, भोसरी, पुनावळे, देहूरोड यासह शहरालगत मोठ्या वखारी असून, त्यांच्यासह लहान - मोठ्या वखारींचे प्रमाण १५ वर पोहोचले आहे. व्यापारासाठी वनविभागाकडून दर वर्षी परवान्याचे नूतनीकरण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी नागपूर कार्यालयास आॅनलाईन अर्ज करावा लागतो. नियमांचे पालन होत असल्याबाबत स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी पाहणी अहवाल पाठवितात. त्यानुसार शहरातील केवळ २ वखारींना परवाना मिळाला असून, २ वखारींचा अर्ज प्रतीक्षेत आहे. इतर वखारींना व लाकूड डेपोंचा धंदा राजरोसपणे सुरू आहे.
या वखारींसाठी शहरालगतची गावे तसेच, मावळ तालुक्यातूून लाकडांचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. ते गावोगावी फिरून मोठाली झाडे विकणारांचा शोध घेतात.