पाणीपट्टीवाढीची चर्चा लांबणीवर

By Admin | Updated: February 13, 2016 03:20 IST2016-02-13T03:20:45+5:302016-02-13T03:20:45+5:30

शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी पाणीपट्टीमध्ये सलग ३० वर्षे वाढ करण्याच्या प्रस्तावावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, काँग्रेसकडून जोरदार टीका होण्याची शक्यता

Discussion of water bottlenecks to be postponed | पाणीपट्टीवाढीची चर्चा लांबणीवर

पाणीपट्टीवाढीची चर्चा लांबणीवर

पुणे : शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी पाणीपट्टीमध्ये सलग ३० वर्षे वाढ करण्याच्या प्रस्तावावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, काँग्रेसकडून जोरदार टीका होण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाने एकत्र येऊन मुख्य सभेचे कामकाज शुक्रवारी पुढे ढकलले. महापालिकेतील करांबाबतच्या नियमाचा आधार घेत चर्चा टाळण्यासाठी ही खेळी खेळण्यात आली. याला शिवसेना, मनसे व काँग्रेसने जोरदार विरोध केल्याने प्रचंड गोंधळातच सभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. अंदाजपत्रकाशी संबंधित करवाढीच्या विषयांवर नियमानुसार मुख्य सभेमध्ये केवळ १५ फेब्रुवारी पर्यंतच चर्चा करता येते. त्यानंतर विषय आल्यास तो विषय चर्चा न करता मंजूर किंवा नामंजूर करावा लागतो. शहराच्या पाणीपट्टीमध्ये आगामी वर्षात १२ टक्के, त्यानंतर पुढील सलग ५ वर्षे १५ टक्के, त्यानंतर २०४७ पर्यंत प्रत्येक वर्षी ५ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. मात्र पाणीपट्टी वाढीला मोठय््या प्रमाणात विरोध होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अंदाजपत्रकातील नियमाचा आधार घेत सभा तहकूब करण्यात आली. पाणीपट्टीवाढविरोधात शिवसेनेने महापालिकेवर गुरुवारी मोठा मोर्चा काढला. पाणीपट्टीवरील विशेष सभेला सुरुवात होताच शिवसेना, मनसेच्या सदस्यांनी आक्रमक होत त्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. पुणेकरांवर पाणीपट्टीवाढीचा बोजा टाकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या निषेधाचे फ्लेक्स आणि झेंडे हातात घेऊन शिवसेना, मनसेच्या सदस्यांनी महापौरांच्या समोरील जागेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच सभागृहनेते बंडू केमसे यांनी आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांचा मुरूड येथील घटनेत मृत्यू झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यात यावी असा प्रस्ताव मांडला. मुरूड येथे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना मागील सभेतच श्रद्धांजली वाहण्यात आली होती; मात्र केवळ आजची विशेष सभा तहकूब करण्यासाठी पुन्हा श्रद्धांजली वाहून सभा पुढे ढकलण्यास शिवसेना, मनसे व काँग्रेसच्या सभासदांनी जोरदार आक्षेप घेतला. महापौर दालनात धावले पाणीपट्टी वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी आयोजित केलेली सभा १६ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर बोलायचे असतानाही महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मतदान पुकारून घाईघाईत सभा तहकूब केली. याविरोधात मनसे, शिवसेना व काँग्रेसच्या सदस्यांनी महापौरांच्या दालनात धाव घेऊन नाराजी व्यक्त केली. ठराव बेकायदेशीर बीपीएमसी अ‍ॅक्टनुसार केवळ पुढील वर्षभराचे सर्वसाधारण कर ठरविण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. बीपीएमसी अ‍ॅक्ट १२७ ते १३४ मध्ये याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कोणत्याही आधाराशिवाय पुढील २१ वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीचा निर्णय घेणे बेकायदेशीर आहे. याबाबत विधी सल्लागारांचा अभिप्राय घेऊन मगच निर्णय घेण्यात यावा. अन्यथा या निर्णयाविरोधात राज्य शासन व न्यायालयाकडे धाव घेऊ, असे शिवसेनेचे शहर संघटक शाम देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. या तहकुबीवर बोलायचे असल्याची मागणी मनसेचे गटनेते बाबू वागसकर आणि कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केली. त्याच वेळी महापौरांनी तहकुबीवर मतदान घेण्याचे आदेश दिले. नगरसचिव सुनील पारखी यांनी तहकुबीवर मतदान पुकारले. राष्ट्रवादी व भाजपाने एकत्र मतदानाने ५२ विरुद्ध ४७ मतांनी सभेची तहकुबी मंजूर करून घेतली.

काँग्रेस सुरुवातीपासून राष्ट्रवादी व भाजपाच्या या अघोषित युतीकडे लक्ष वेधत आहे. पाणीपट्टीतील ही वाढ पुणेकरांसाठी अत्यंत अन्यायकारक आहे. स्वप्न दाखवले जात आहे, मात्र त्याची पूर्ती करण्याआधीच ते दाखवण्याची फी वसूल करण्याचा हा प्रयत्न आहे. - अरविंद शिंदे, गटनेते, काँग्रेस

कशाच्या जोरावर हे ३० वर्षे पुढची दरवाढ करीत आहे तेच समजत नाही. सत्ता ५ वर्षांची असते व दरवाढीसारखे निर्णयही ५ वर्षांच्या मर्यादेतीलच असावेत हा संकेत आहे. गरीब जनतेसाठी पाणीपट्टीतील ही वाढ सुलतानी वाढ ठरणार आहे, पाणी द्या, त्याला कोणाचाच, आमचाही विरोध नाही. - अशोक हरणावळ, शिवसेना गटनेते

काँग्रेस व भाजपा मिळून पुणेकरांचे पाकीट मारत आहेत व त्याला आयुक्तांची साथ आहे हा मनसेचा जाहीर आरोप आहे. सत्तेच्या बळावर काहीही करण्याचा हा प्रकार आहे. भाजपाला पुणे शहराने ८ आमदार दिले, त्याची थोडी तरी जाणीव त्यांनी या पाणीपट्टीवाढीला पाठिंबा देताना ठेवायला हवी होती. - राजेंद्र वागसकर, मनसे, गटनेते

मुरूड दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहणे पालिकेचे कर्तव्यच आहे. त्याचे राजकारण करणे अयोग्य आहे. या योजनेत काहीच वाईट नाही असे राष्ट्रवादीचे मत आहे. आता नाही तर १६ फेब्रुवारीला चर्चा करा, त्या वेळी संधी आहेच. - बंडू केमसे, सभागृह नेते,

राष्ट्रवादी भाजपाचा पाणीपट्टीवाढीला पाठिंबा नाही तर पुणेकरांना २४ तास पाणी मिळण्याला पाठिंबा आहे. चांगल्या कामाला चांगले म्हणणे यात चुकीचे काहीही नाही. भाजपा कधीही विरोधासाठी विरोध करीत नाही. त्यामुळेच आम्ही विचारपूर्वक या योजनेला पाठिंंबा दिला आहे. - गणेश बीडकर, गटनेते, भाजपा

Web Title: Discussion of water bottlenecks to be postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.