रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:20 IST2018-09-30T23:20:43+5:302018-09-30T23:20:57+5:30
खेड- शिवापूर : चार महिन्यांपूर्वी केलेला रस्ता पुन्हा उखडला

रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था
खेड शिवापूर : कोंढणपूर फाटा (पुणे-सातारा महामार्ग) ते तीर्थ कोंढणपूर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे काम घटस्थापनेपूर्वी करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांसह भाविकांकडून केली जात आहे. कोंढणपूर फाटा ते कोंढणपूर दरम्यानच्या रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने दुरुस्त केले होते. चार महिन्यां पूर्वी केलेले काम पूर्णत: उखडले आहे. येत्या दहा दिवसांनी दसरा तोंडावर आला आहे. या दहा दिवसांदरम्यान राज्यातून तसेच परराज्यातून, स्थानिकांसह अनेक भाविक श्री क्षेत्र कोंढणपूर (ता. हवेली) येथील तुकाईमाता मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येत असतात. या भाविकांना या रस्त्याचा प्रचंड त्रास होणार आहे.
तसेच याच मार्गाने खेड शिवापूर परिसरातील ज्येष्ठ नागरिक पहाटे पाच ते सात किमी व्यायामासाठी चालत जातात. यामुळे या ज्येष्ठ नागरिकांनी हा रस्ता घटस्थापनेपूर्वी दुरुस्त करून घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. खड्ड्यांबरोबरच परिसरात गटारीची व्यवस्था केली नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहात आहे. यामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला पांढरे पट्टे मारण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. याबाबत बांधकाम अधिकाऱ्यांना विचारले असता संबंधीतांना नोटीस दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
परंतु चार महिन्यांपूर्वीच
केलेला रस्ता पुन्हा उखडला कसा? या प्रश्नाचे उत्तर खुद्द संबंधित प्रशासनाकडूनही मिळत नाही.
खेड शिवापूर परिसरात ठेकेदारांनी दुरुस्त केलेल्या रस्त्यांची पूर्णत: चाळण झाली आहे आणि प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.
महामार्ग (कोंढणपूर फाटा) ते तीर्थ क्षेत्र कोंढणपूर दरम्यानच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अत्यंत दुरवस्था झाली आहे.