खोदाईवरून राष्ट्रवादी-आयुक्तांमध्ये जुंपली
By Admin | Updated: April 6, 2016 01:41 IST2016-04-06T01:41:06+5:302016-04-06T01:41:06+5:30
रस्ते खोदाई करताना एखाद्या कंपनीकडून नियमाचे उल्लंघन झाले म्हणून सरसकट सर्वच कंपन्यांची कामे थांबविता येणार नाहीत

खोदाईवरून राष्ट्रवादी-आयुक्तांमध्ये जुंपली
पुणे : रस्ते खोदाई करताना एखाद्या कंपनीकडून नियमाचे उल्लंघन झाले म्हणून सरसकट सर्वच कंपन्यांची कामे थांबविता येणार नाहीत. त्या कंपन्यांना दिलेल्या परवानगीनुसार एप्रिल अखेरपर्यंत ही कामे सुरू राहतील, अशी भूमिका महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी मंगळवारी स्पष्ट केली. त्याच वेळी खोदाईचा कालबद्ध कार्यक्रम आयुक्तांनी जाहीर न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. एकंदरीतच खोदाई प्रकरणावरून येत्या काही दिवसांत प्रशासन व सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळणार आहे.
आयुक्तांनी खोदाई सुरूच ठेवण्याच्या घेतलेल्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची बैठक मंगळवारी वंदना चव्हाण आणि प्रशांत जगताप यांनी घेतली. पक्षाच्या बैठकीमध्ये नगरसेवकांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. महापौर तसेच नगरसेवकांना विश्वासात न घेता आयुक्त काम करीत असल्याच्या भावना या वेळी नगरसेवकांनी व्यक्त केल्या. याबाबत प्रशांत जगताप यांनी सांगितले, ‘‘आयुक्तांनी महापालिकेतील बैठका, विकासकामांच्या व्हिजिट याकडे लक्ष द्यावे. खोदाईबाबत त्यांनी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक आहे. त्यामध्ये ज्या कंपन्यांकडून चुकीच्या पद्धतीने खोदाई झाली आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. नवीन रस्त्यावर कोणत्याही परिस्थितीत खोदाईची कामे होऊ नयेत, याचा खुलासा आयुक्तांनी करावा; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.’’
वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘‘महापौरांनी खोदाई बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याबाबत चर्चा करून आयुक्तांनी खोदाईला परवानगी देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी परस्पर खोदाईला परवानगी दिली आहे. महापौरांनी गेल्या काही दिवसांमध्ये २२ व्हिजिट केल्या, एका व्हिजिटचा अपवाद वगळता आयुक्त या भेटीवेळी उपस्थित राहिले नाहीत. नवीन रस्ते उखडून खोदाईची कामे केली जात आहेत. जनतेचा पैसा चुकीच्या पद्धतीने खर्च होणे योग्य नाही, प्रशासन त्याबाबत बेफिकीर आहे. राज्य सरकारच्या दबावातून आयुक्त काम करीत असल्याचे दिसून येत आहे.’’
कुणाल कुमार यांनी सांगितले, ‘‘शहरात येत्या तीन वर्षांत भूमिगत गॅस पाईपलाईनचे जाळे, फोरजीसाठी केबल टाकणे, जलवाहिन्या टाकण्याची कामे करण्यात येणार आहेत. ही सर्व कामे अत्यावश्यक आहेत. मोबाईल कंपन्यांना खोदाईसाठी परवानगी देण्यापूर्वी त्यांच्याकडून रीतसर शुल्क भरून घेण्यात आले आहे. मोबाईल कंपन्या आणि एमएनजीएल यांनी एकत्रित खोदाई करावी, असे नियोजन करण्यात आले होते. मात्र,दोन वेगळ्या कंपन्या असल्यामुळे त्यांच्यामध्ये समन्वायाचा अभाव आहे. एमएनजीएलकडून काम झाल्यानंतर त्याची चाचणी केली जाते. त्यामुळे पंधरा दिवस रस्ता दुरुस्ती करता येत नाही. एप्रिलअखेर नंतर खोदाईची सर्व कामे थांबविण्यात येतील. मे महिन्यात खोदाई झालेल्या सर्व ठिकाणी दुरूस्तीची कामे पूर्ण केली जातील. एखाद्या कंपनीकडून नियमांचे उल्लंघन झाले म्हणून शहरातील सर्व खोदाईची कामे थांबविता येणार नाही. खोदाईच्या कामांमध्ये ज्या कंपन्या गैरप्रकार करतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल.’’
खोदाईच्या कामांचा फेरआढावा घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केली जात असताना आयुक्त मात्र खोदाई होणारच, यावर ठाम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे.